- तर गृह विलगीकरणातील रूग्णांवर कडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:13 AM2021-02-15T04:13:08+5:302021-02-15T04:13:08+5:30
अमरावती : गृह विलगीकरणातील कोरोना संक्रमित रुग्ण करीत शासननियमांचे पालन करीत नसल्यास त्यांना पुन्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले जाईल. ...
अमरावती : गृह विलगीकरणातील कोरोना संक्रमित रुग्ण करीत शासननियमांचे पालन करीत नसल्यास त्यांना पुन्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले जाईल. ही शोधमोहीम सोमवारपासृून आरंभली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त प्रशांत राेडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दुकाने, प्रतिष्ठानांमध्ये गर्दी झाल्यास ते सील करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गत १३ दिवसांपासून शहरात कोरोना संक्रमित रुग्णांच्या आकडेवारीने थैमान घातले आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास असे कार्यक्रम, समांरभावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांचे पालन करण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना आखल्याचे आयुक्त रोडे म्हणाले. शहरात कोरोना संक्रमित रुग्णसंख्या वाढीस लागण्याची कारणे शोधली असता, नागरिक त्रिसूत्रीचे पालन करीत नाहीत, हे प्रथमदर्शनी लक्षात आले आहे. त्यामुळे मास्कचा वापर, शारीरिक अंतर आणि गर्दी टाळणे या बाबीला प्राधान्य दिले जात आहे. कोरोनाच्या नवीन नियमांनुसार गृह विलगीकरणातील रुग्ण नियमांचे पालन न करता बेफिकीरपणे वावरत आहेत. गृह विलगीकरणाच्या नावे नियमांना गुंडाळण्यात आले आहे.
गृह विलगीकरणातील रुग्णांचा सोमवारपासून शोध घेण्यात येणार आहे. यात काही नियमबाह्य आढळल्यास कोरोना संक्रमित रुग्णास शासकीय दवाखान्यात उपचारासाठी पाठविले जाणार आहे. त्याकरिता महापालिका आरोग्य यंत्रणेला गृह विलगीकरणातील रुग्णांचा डेटा मिळविण्याचे निर्देश दिले आहे. ‘डोअर टू डोअर’ भेट देत खरेच हे रुग्ण गृह विलगीकरणात आहे अथवा नाही, हे वास्तव चमू शोधणार असल्याचे आयुक्त रोडे यांनी सांगितले.
---------------
‘कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग’ वाढविण्यावर भर
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य पथकाद्वारे शहरात ‘कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग’ वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची शोधमोहीम राबविली जात आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केला जाणार आहे तसेच महापालिका कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यासाठी वेग आणला जाईल, असे आयुक्त रोडे म्हणाले.