बेपर्वाई आढळल्यास कठोर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 05:00 AM2020-04-06T05:00:00+5:302020-04-06T05:00:46+5:30
नागरिकांनीही शिस्तभंग करून आपले व इतरांचेही अमूल्य जीवन धोक्यात जाईल, असे वर्तन करू नये. जिल्ह्यात एका मृत व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनावर मात करणे हे आव्हान आहे. त्यामुळे नागरिकांनीही शिस्त पाळली पाहिजे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवकांवर गृहभेटीची जबाबदारी आहे. या कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. सर्व यंत्रणा चांगले काम करत आहे. मात्र, कुठेही बेजाबदारपणा आढळल्यास कठोर कारवाई करू, असा इशारा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी दिला.
नागरिकांनीही शिस्तभंग करून आपले व इतरांचेही अमूल्य जीवन धोक्यात जाईल, असे वर्तन करू नये. जिल्ह्यात एका मृत व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनावर मात करणे हे आव्हान आहे. त्यामुळे नागरिकांनीही शिस्त पाळली पाहिजे.
आपल्या बेजबाबदार वर्तनाने केवळ स्वत:लाच नव्हे, तर इतरांनाही धोका होऊ शकतो, याचे भान ठेवावे. ताप, खोकला, श्वसनक्रियेत अडथळा अशी कुठलीही तक्रार असल्यास त्याची माहिती पथकाला द्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
सहायता केंद्रात १८ जणांचे पथक
नागरिकांच्या सुविधेसाठी जिल्हा रुग्णालय व सुपरस्पेशालिटी रुग्णालयात सहायता केंद्रे सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. येथे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका यांच्याकडून १८ जणांचे पथक काम करेल. प्रवासी नागरिक, मजूर बांधव यांच्यासाठी जिल्ह्याप्रमाणेच प्रत्येक तालुक्यात निवारा केंद्रे सुरू केलेली आहेत. त्यांची भोजन, निवास, आरोग्य दक्षता आदी व्यवस्था करण्यात आल्याचे ना. ठाकूर म्हणाल्या.
सुपरस्पेशालिटीत तपासणी करा
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कोविड रूग्णालय सुरू करण्यात येत आहे. सर्दी, ताप, न्युमोनियाची लक्षणे असणाºया रुग्णांनी सरकारी रुग्णालयात, कोविड चाचणी केंद्रात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी. या रूग्णालयात डॉक्टर, पारिचारिका, सुरक्षारक्षक असा १०० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा स्टॉफ नियुक्त असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.