दीपाली आत्महत्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:13 AM2021-04-16T04:13:09+5:302021-04-16T04:13:09+5:30
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी प्रमुख दोषींवर कायदेशीररीत्या कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी गुरुवारी राज्यपाल, ...
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी प्रमुख दोषींवर कायदेशीररीत्या कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी गुरुवारी राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना ई-मेल पाठविण्यात आले आहे. जस्टीस फॉर दीपाली, माहेर संस्थेने त्याकरिता पुढाकार घेतला आहे.
दीपाली यांनी २५ मार्च रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना अटक करण्यात आली. मात्र, निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्थांनी मागणी केल्यानंतरही वनविभाग, पोलीस खाते रेड्डी यांचा बचाव करीत असल्याचा आक्षेप घेण्यात आला. दीपाली चव्हाण यांना मानसिक, आर्थिक त्रास देणाऱ्या विनोद शिवकुमार याला पाठीशी घालणारे एम.एस. रेड्डी हे सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. अचलपूर न्यायालयाने सुद्धा रेड्डी जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे. रेड्डीहे जर निर्दोष असतील तर ते अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धावपळ का करीत आहेत, असा सवाल तक्रारीतून मांडला गेला. विशेष पोलीस महानिरीक्षक मीणा, जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांना सुद्धा भेटून दीपाली आत्महत्या प्रकरणाचे वास्तव मांडले आहे. मात्र, रेड्डी यांना वाचविण्यासाठी उच्चस्तरावर प्रयत्न होत असल्याचे तक्रारी म्हटले आहे. वनविभागाने गठित समिती ही देखील रेड्डी यांची पाठराखण करणारी आहे, असे जस्टीस फॉर दीपाली, माहेर संस्थेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या तक्रारीतून म्हटले आहे.
----------------
दीपाली आत्महत्या प्रकरणाचे मुख्य गुन्हेगाराला अटक नाही. याउलट वनविभागाची समिती दीपाली यांना आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्यांना सोडून तिचीच चौकशी करीत आहेत. त्यामुळे आता न्याय मागण्यासाठी थेट राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्धारे तक्रार पाठविली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून ई-मेल प्राप्त झाल्याचे कळविले आहे.
- अरुणा सबाने, प्रमुख, जस्टीस फॉर दीपाली चव्हाण