कडक संचारबंदी, १२ च्या आत रस्त्यांवर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:13 AM2021-05-10T04:13:06+5:302021-05-10T04:13:06+5:30
अमरावती : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कडक संचारबंदीचे नवे आदेश रविवारी दुपारी १२ पासून जारी ...
अमरावती : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कडक संचारबंदीचे नवे आदेश रविवारी दुपारी १२ पासून जारी केले. त्यामुळे सकाळपासून बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली होती. मात्र, दुपारचे १२ वाजतानंतर रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला.
जिल्ह्यात रविवारी दुपारचे १२ ते १५ मे रोजी रात्रीचे १२ पर्यंत जिल्ह्यात कठोर लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी जाहीर केली. त्यामुळे शनिवार व रविवारी विहित मुदतीत म्हणजेच सकाळी ११ पर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, पिठाची गिरणी, तेल भांडार, पेट्रोलपंप, एटीएम, भाजीबाजार या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. मुख्य बाजारपेठ वगळता आतल्या भागात इतरही दुकाने दुपारी १२ पर्यंत सुरू होती. महापालिकेचा बाजार परवाना व अतिक्रमण विभागाद्वारा तसेच शहर पोलिसांनीही मुख्य मार्गाने पाहणी केली. जी दुकाने उघडी होती त्यांच्या मालकांना तंबी देऊन तत्काळ बंद करायला लावल्याचेही दिसून आले.
बॉक्स
अक्षयतृतीयाचे सामानासाठी गर्दी
लॉकडाऊनमध्येच येत्या शुक्रवारी अक्षयतृतीया आहे. त्यामुळे मातीचे मडके, आंबे, वाळा आदी सामान घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. याशिवाय आवश्यक भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांचा ओढा दिसून आला. जसजसे १२ वाजत आले तसा भाजीपाला, आंबे, टरबूज आदी मिळेल त्या भावात विकण्यात आल्याचे दिसून आले.
बॉक्स
विनाकारण फिरणाऱ्यांचीच गर्दी अधिक
लॉकडाऊन लागत असल्याच्या कारणास्तव बाजारात फिरून येण्यासाठी काहींनी विनाकारण गर्दी केल्याचे दिसून आले. दुपारी १२ नंतर अशा वाहनचालकांना चौकातील पोलिसांनी तंबी देऊन सोडल्याचे दिसून आले. पेट्रोलपंप व एटीएमवर शनिवारप्रमाणेच रविवारीदेखील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दृष्टीस पडले.