प्राणवायूच्या उपलब्धतेसाठी काटेकोर नियाेजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:18 AM2021-08-20T04:18:07+5:302021-08-20T04:18:07+5:30
अमरावती : कोरोनाच्या संभाव्य तीसऱ्या लाटेचा धोका ओळखून प्राणवायू व औषधींची कमतरता भासणार यासाठी काटेकोर नियोजन करून त्याप्रमाणे अनुषंगिक ...
अमरावती : कोरोनाच्या संभाव्य तीसऱ्या लाटेचा धोका ओळखून प्राणवायू व औषधींची कमतरता भासणार यासाठी काटेकोर नियोजन करून त्याप्रमाणे अनुषंगिक बाबींची आताच तजवीज करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी संबंधित विभागाला दिले.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा ना. शिंगणे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. सह आयुक्त सुरेश अन्नापुरे, घोराळ, अन्न व औषध प्रशासन निरीक्षक मनीष गोतमारे यांच्यासह विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. ना. शिंगणे म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून विभागात ऑक्सिजन व कोरोना संबंधीची औषधींचा पुरेसा साठा उपलब्ध असला पाहिजे. यासाठी मागील वर्षीच्या उच्चतम ॲक्टिव्ह रुग्णसंख्येच्या दीडपट रुग्णसंख्येला जेवढा ऑक्सिजन लागेल, त्या हिशेबाने ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी काटेकोर नियोजन करावे. ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णांचा मृत्यू होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोरोना आजारावर प्रतिबंधात्मक औषधींचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध ठेवावा. औषधींचा काळा बाजाराला आळा, व औषधी नियंत्रणाचे काम विभागाने जाणीवपूर्वक करावे.
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक बाधा होणार असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविले आहे. त्यानुसार जिल्ह्यात शासकीय तसेच खासगी रुग्णालयात लहान मुलांसाठी ऑक्सिजन सुविधेसह चाईल्ड केअर सेंटरची निर्मितीसाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाशी समन्वय ठेऊन उपाययोजना कराव्यात.
----------------
गुटखा विक्री, भेसळी रोखा
गुटखा सेवनाने कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सुगंधित सुपारी, गुटखा, मावा विक्री तसेच खाद्य तेल व पदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीच्या प्रकरणांत दोषींवर भादंविच्या कलम २५ तसेच कलम ३२८ अन्वये कारवाई करण्याचे विभागाला अधिकार प्रदान करण्यात आले आहे. त्यानुसार धाडसत्र राबवून गुटखा विक्रीच्या व भेसळीच्या कारवाईंना गती द्यावी, असे ना. शिंगणे म्हणाले.