राष्ट्रसंतांच्या भजनांतून प्रहार

By Admin | Published: April 25, 2017 12:06 AM2017-04-25T00:06:53+5:302017-04-25T00:06:53+5:30

मद्य विकत घेणाऱ्यांसह मद्यपींच्या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांनी भजनाचा अभिनव मार्ग पत्करत प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला.

Strike in the praises of Rashtra Saints | राष्ट्रसंतांच्या भजनांतून प्रहार

राष्ट्रसंतांच्या भजनांतून प्रहार

googlenewsNext

केशव कॉलनीवासीयांचे अभिनव आंदोलन : दारू दुकान बंद करण्यासाठी "गांधीगिरी"
अमरावती : मद्य विकत घेणाऱ्यांसह मद्यपींच्या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांनी भजनाचा अभिनव मार्ग पत्करत प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. येथील केशव कॉलनी परिसरातील दारू दुकानासमोर सोमवारी शेकडो महिला-पुरुषांनी ग्रामगीतेमधील भजने गायिलीत.
महामार्गावरील दारू दुकानांवर टाच आणल्यानंतर शहरातील अंतर्गत भागात असलेली मद्यालये मद्यपींनी तुडूंब भरून वाहू लागली आहे. सायंकाळनंतर तर या दारू दुकानांमध्ये मुंगी शिरायलाही जागा नसते. यातून नागरी भागातील सर्वसामान्य जन त्रस्त झाले असून, त्यांनी या दारू विक्रीविरुद्ध एल्गार पुकारला आहे. बिनदिक्कतपणे चाललेल्या या दारू विक्रीवर निर्बंध घालावा, ही मागणी जोर धरत असून, त्यासाठी स्थानिकांनी भजन-कीर्तनाचा मार्ग अवलंबला आहे.
ग्रामगीतेमधील ‘दारू पिऊनि मारिती स्त्रीला, सगळ्या गावीच चळ सुटला, पूर आला भांडाभांडीला, कोर्ट कचेऱ्या गजबजल्या’, हे भजन म्हणत या महिला-पुरुषांनी केशव कॉलनीतील दारू दुकान कायमस्वरुपी हटविण्याची मागणी बुलंद केली. येथील रहिवाशांनीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या व्यसनमुक्तीपर भजनांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
केशव कॉलनी या उच्चभ्रू वस्तीतील क्लासिक कॉम्प्लेक्समध्ये आनंद लिकर्स हे दारू दुकान आहे; तथापि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर १ एप्रिलपासून या दुकानांवरील गर्दीमध्ये मोठी वाढ झाल्याने येथील नागरिक संत्रस्त झाले आहे. या परिसरात गर्ल्स हायस्कूल, विद्याभारती महाविद्यालयासह शाळा व अनेक शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे कॅम्प मार्गस्थित केशव कॉलनीत सततची वर्दळ सुरू असते. अशावेळी दिवसरात्र मद्यपींचा त्रास होतो. येथील अस्तव्यस्त वाहनांमुळे दररोज वाहतुकीची कोंडी निर्माण होते. मद्यपी मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करून आरडाओरड करीत असल्यामुळे रहिवाशांंची शांतता भंग झाली आहे. या भागात अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने सोमवारी मोझरी, यावली व अंजनगाव सुर्जी येथील भजनी मंडळ, अपूर्वा बचत गटातील ४० ते ५० महिलांनी सहभाग नोंदवून राष्ट्रसंतांच्या भजनातून प्रबोधन केले. यावेळी अतुल गायगोले, पंकज चेडे, बाळासाहेब मार्डीकर, सुनील वानखडे, सुनील राठी, विवेक चुटके, अविनाश भंडागे, अजय देशमुख, महेंद्र मुरके, दादाराव पांडे यांच्यासह आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)

मार्केटचे पार्किंग बेपत्ता
क्लॉसिक कॉम्पलेक्समध्ये वाहने ठेवण्यासाठी पार्कींगची व्यवस्था नसल्यामुळे त्या ठिकाणी येणारे ग्राहक हे रस्त्यावरच वाहने पार्क करतात. रस्त्यावर वाहन पार्क होत असल्यामुळे केशव कॉलनीतील रहिवाशांना ये-जा करणाऱ्यांस मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्केटला पार्कीग नसतानाही महापालिकेकडून बांधकामाची परवानगी देण्यात आली. हे विशेष.

रस्त्यालगतच खुले वाचनालय
दारू दुकान हटविण्यासाठी केशव कॉलनीवासीयांनी अहिंसक आंदोलनाला सुरुवात केली. या व्यतिरिक्त रस्त्यालगतच मंडप टाकून खुले वाचनालय सुरु करण्यात आले आहे. सदा सर्वदा ग्रुपद्वारे हे खुले वाचनालय सुरु करण्यात आले असून आध्यात्मिक, व्यसनमुक्ती, अभ्यास उपयोगी, ज्ञानापयोगी तसेच ऐतिहासिक पुस्तके वाचनासाठी ठेवण्यात आली आहेत. यासाठी प्रशांत खापेकर, सुनील झोंबाडे, अतुल जिराफे, गौरव इंगोले, सचिन सावरकर, अतुल यादगिरे आदी परिश्रम घेत आहे.

Web Title: Strike in the praises of Rashtra Saints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.