जीवघेणे वादळ
By admin | Published: April 9, 2015 12:15 AM2015-04-09T00:15:49+5:302015-04-09T00:15:49+5:30
बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या वादळाने तब्बल अर्धा तास थैमान घातले.
प्रचंड हानी : काँक्रीटचे निर्माणाधीन स्टेडियम कोसळले, १५ जखमी
अमरावती : बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या वादळाने तब्बल अर्धा तास थैमान घातले. या जीवघेण्या वादळामुळे जिल्हाभरात जीव व वित्तीय हानी झाली. जिल्हाभरातून पडझडीचे वृत्त आहे. देशपांडे प्लॉट परिसरात एका घराच्या छपराचा टीन बांधत असताना वाऱ्याच्या तडाख्याने खाली कोसळून संजय सोमजी भालेराव नामक (५५,रा. कंवरनगर) नामक मजुराचा मृत्यू झाला. शहरात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. बोर्ड, होर्डिंग्ज उडाल्याने प्रचंड नुकसान झाले. कित्येक घरांचे छत उडाल्याने अनेक कुटूंब उघड्यावर आले. श्रीकृष्ण पेठेतील एका शो रूमची (काच) फ्रेम वादळाने उडून रस्त्यावर पडल्याने यात सात जण जखमी झालेत. त्यात दोन बालकांचा समावेश आहे.
‘लोकमत’चे भाकित खरे ठरले
‘लोकमत’चे भाकित खरे ठरले
‘लोकमत’ने ७ एप्रिलच्या अंकात ‘बुधवार, गुरूवारी विजेच्या गडगडाटासह वादळी पाऊस’ या मथळ्याखाली हवामानाचा अंदाज देणारे वृत्त प्रकाशित केले होते. ते भाकित तंतोतंत खरे ठरले.
टीन बांधणाऱ्या मजुराचा मृत्यू
शहरातील देशपांडेवाडी परिसरातील महावीरनगरात घराच्या छपराचे टीन बांधणारा मजूर वेगवान वाऱ्यामुळे टिनासह खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला. वादळी वाऱ्यामुळे त्याचे संतुलन बिघडल्याने तो खाली कोसळला. भालेराव असे मृत मजुराचे नाव आहे. त्याचा सहकारी मजूरदेखील यामध्ये गंभीर जखमी झाला आहे.
हव्याप्र मंडळाची भिंत कोसळून महिला गंभीर
हव्याप्र मंडळानजीकच्या दत्तवाडी परिसरातील हव्याप्र मंडळाच्या निर्माणाधीन इनडोअर स्टेडियमची भिंत लगतच्या चार घरांवर कोसळल्याने यात महिला गंभीर जखमी झाली. तिला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कल्पना उमेश महात्मे (४२, रा. दत्तवाडी) असे महिलेचे नाव आहे. या घटनेत अन्य तिघे किरकोळ जखमी झालेत.
बडनेऱ्यातील
बहुतांश कुटुंब उघड्यावर
बडनेऱ्यातील इंदिरानगर, रजानगर, मदारी मोहल्ला, मोतीनगर झोपडपट्टी भागातील अनेक घरांची छप्परे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उडून गेली. अनेक पक्क्या घरांचे छत कोसळले. यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत. यामुळे महिला, बालकांचा आकांत होत आहे. विद्युत तारा तुटल्याने बडनेऱ्यातील खंडित झालेला विद्युत पुरवठा वृत्त लिहेस्तोवर सुरळीत झाला नव्हता. वादळाचा जोर प्रचंड असल्याने अनेक बोर्ड, होर्डिंग्ज, रस्त्यांवर येऊन पडले. वादळाचा कहर सुरू असताना पावसाचा जोर मात्र फारसा नव्हता. पाच ते दहा मिनिटे पावसाच्या तुरळक सरी बरसल्या.