-तर प्रहार उतरणार रस्त्यावर
By admin | Published: March 31, 2016 12:13 AM2016-03-31T00:13:57+5:302016-03-31T00:13:57+5:30
मुंबई येथे मंत्रालयात कामानिमित्त गेलेले अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यावर खोटे आरोप करीत गुन्हा नोंदविण्यात आला आहे
बच्चू कडूंना समर्थन : गुन्हे मागे घेण्याची मागणी
परतवाडा/दर्यापूर : मुंबई येथे मंत्रालयात कामानिमित्त गेलेले अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यावर खोटे आरोप करीत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यानिषेधार्थ बुधवारी सकाळी ११ वाजता प्रहार कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.
मंत्रालयातील उपसचिव हे जाधव नामक लिपिकाचे काम करण्यात हयगय करीत असल्याने अचलपूरचे आ. बच्चू कडू यांनी सामान्य प्रशासन विभागात जाऊन त्यांची भेट घेऊन जाधव यांचे काम करुन देण्याची मागणी केली होती. त्यावर सबंधितांमध्ये वाद झाला. मात्र, घटनेचा विपर्यास करून आमदार बच्चू कडूंविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. इतकेच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरुन मंत्रालयातील कामकाजबंद करण्यात आले.
यासर्व बाबी निषेधार्ह असून अचलपूर तालुका प्रहार संघटनेच्यावतीने या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात तालुका प्रहार संघटनेच्यावतीने आंदोलन करून मागण्यांचे एक निवेदन देण्यात आले. आ. कडुंवरील खोटे आरोप मागे घेऊन सामान्य नागरिकांना वेठीस धरू नये. असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी प्रहारचे बल्लू जवंजाळ, अविनाश सुरंजे, संजय तट्टे, प्रवीण पाटील, शाम अग्रवाल, गजानन मोरे, दीपक धूळधर, प्रशांत आवारे, दीपक भोरे, नीलेश भांडे, दिलीप जवंजाळ, अनिल विधळे, राजा टेकाम, पंजाब बेदरकर, रूपेश लहाने, विजय धावाणी, अंकुश जवंजाळ, मोहन सातपुते आदींची उपस्थिती होती.
दर्यापुरातही प्रहारने दिले निवेदन
दर्यापूर : अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी मुंबई मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव डी.आर. गावीत यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. परंतु आ.बच्चू कडू यांना अटक केल्यास प्रहार युवाशक्ती संघटनेने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. अपंग अशोक जाधव नामक कर्मचाऱ्याच्या प्रलंबित मागणीसाठी विचारणा केली असता गावित यांनी आ.कडू यांना उध्दट उत्तर दिले. तसेच दमदाटी केल्यामुळेच आमदारांचा पारा चढल्याने हा वाद झाला. याप्रकरणात आ. बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आमदारांना अटक झाल्यास प्रहार युवाशक्ती संघटनेने रस्त्यावर उतरण्याचा इशारा तालुकाध्यक्ष महेश कुरळकर, रितेश बाराहाते, गजानन आगलावे, प्रमोद इंगळे, मनोज अढाऊकर, गजानन रोडे, सुधीर पवित्रकार, अर्जुन रघुवंशी, प्रशांत कडू, विजय हरणे, अरविंद हरणे, अरविंद कराळे आदींनी दिला आहे.