वीज, वादळासह अवकाळीने घात; चार व्यक्ती, २६ गुरे मृत, ७२०० हेक्टरला फटका
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 8, 2023 06:00 PM2023-04-08T18:00:19+5:302023-04-08T18:02:50+5:30
विभागात २४ तासांत सरासरी ८.७ मिमी पाऊस
अमरावती : पश्चिम विदर्भात शुक्रवारी वीज, वादळांसह झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. या आपत्तीमध्ये चार व्यक्ती मृत झाले, याशिवाय २९ जनावरे मृत झाली, ७१५८ हेक्टरमधील रब्बी, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले. याशिवाय १५१ घरांची पडझड झाल्याचा विभागीय आयुक्तांचा प्राथमिक अहवाल आहे.
विभागात २४ तासांत सरासरी ८.७ मिमी पाऊस पडला. मार्च महिन्यापासून तिसऱ्यांदा वीज वादळासह झालेल्या अवकाळी पावसाने संकट ओढावले आहे. यावेळी अंगावर वीज कोसळून बुलढाणा जिल्ह्यात २, अमरावती व अकोला जिल्ह्यात प्रत्येकी १, अशा चार जणांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय आपत्तीमध्ये अकोला जिल्ह्यात १६, बुलढाणा ७, यवतमाळ ४ व अमरावती जिल्ह्यात २, अशा एकूण २९ जनावरांचा मृत्यू झालेला आहे.
वादळासह पावसाने अमरावती जिल्ह्यात ११२, अकोला ३५, बुलढाणा ३ व यवतमाळ जिल्ह्यात १ अशा एकूण १५१ घरांची पडझड झालेली आहे. यामध्ये पाच घरे पूर्णत: नष्ट झाली असल्याचा विभागीय आयुक्तांचा प्राथमिक अहवाल आहे. विभागात आणखी दोन दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
रब्बी, भाजीपाला, फळपिकांचे मोठे नुकसान
पश्चिम विदर्भात शुक्रवारच्या अवकाळी पावसाने गहू, कांदा, मिरची, लिंबू, संत्रा, आंबा, हरभरा, टरबूज, पपई, भाजीपाला, शेवगा, तूर, मका, ज्वारी, हळद व सूर्यफुलाचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक ५२४२ हेक्टरमध्ये अकोला जिल्ह्यात, ११२० हेक्टर बुलढाणा, ५२३ हेक्टर अमरावती, २५५ हेक्टर यवतमाळ व १८.४८ हेक्टरमध्ये वाशिम जिल्ह्यात नुकसान झाले आहे.