एसटी कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवूनच हल्ला; शरद पवार यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 10:10 AM2022-04-11T10:10:09+5:302022-04-11T12:05:31+5:30
रविवारी अमरावतीत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय संवाद बैठकीला पवार यांनी संबोधित केले.
अमरावती : देशात सत्ता आहे. मात्र, महाराष्ट्रात सत्ता नसल्याने विरोधक अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची सत्ता धोक्यात आणण्यासाठी दरदिवशी नवनवी षडयंत्रे रचली जात आहेत. ईडी, सीबीआय चौकशी हे खेळणे करून ठेवले आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर कसे होईल, याचे स्वप्न विरोधक बघत आहेत. एसटी कामगारांच्या आड घरावर झालेला हल्ला हे त्याचेच द्योतक आहे. एसटी कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांनीच तो हल्ला घडवून आणला, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी रविवारी केला.
बेरोजगारी, महागाईच्या मुद्यांवरून लक्ष वळविण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना अस्थिर करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारी येथे केला.
अमरावतीत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय संवाद बैठकीला पवार यांनी संबोधित केले. ते म्हणाले, देशात बेरोजगारी, महागाई यासारखे अनेक बिकट प्रश्न असताना त्यावरून लक्ष वळविण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना अस्थिर करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न होत आहे. मी गत ४० ते ५० वर्षांपासून एसटी कामगारांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी आघाडीवर आहे. घरावर हल्ला करण्यामागे मी कामगारांना दोष देणार नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. सर्वसामान्य एस.टी. कामगारांना भडकावले; कारण नेतृत्व चुकीचे होते, असे ते म्हणाले.
राजकारणात मी अनेक संकटे जवळून बघितली आहेत. मुंबईचा बॉम्बस्फोट असो वा किल्लारीचा भूकंप. मुंबईत दंगली झाल्या तेव्हा हिंदू व मुस्लीम भागांतही जाऊन भेटी घेतल्या. शुक्रवारी बॉम्बस्फोट झाला आणि सोमवारी मुंबई पुन्हा धावली. मात्र, अलीकडे सांप्रदायिक शक्तींकडून एका चित्रपटाच्या नावाने हिंदू समाजात अस्वस्थता पसरविण्याचे काम सुरू आहे, असे सांगून संविधानावर विश्वास असलेल्या विचारसरणींनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मंचावर खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, एकनाथ खडसे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, आमदार इंद्रनील नाईक, आमदार अमोल मिटकरी, आमदार किरण सरनाईक, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, सुरेखा ठाकरे, माजी आमदार राजू तोडसाम, माजी आमदार संदीप बाजोरिया, वसंत घुईखेडकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, पवार यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले; तसेच अचलपूर येथील फिनले मिल कामगारांचे प्रश्न त्यांनी जाणून घेतले.