'सीएस'वर कारवाईची टांगती तलवार
By admin | Published: March 27, 2015 12:03 AM2015-03-27T00:03:26+5:302015-03-27T00:03:26+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांनी परिचारिकांशी असभ्य भाष्य केल्यामुळे त्यांच्यावर गंडांतर येण्याची शक्यता ..
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांनी परिचारिकांशी असभ्य भाष्य केल्यामुळे त्यांच्यावर गंडांतर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याप्रकरणी चौकशी समितीने आरोग्य उपसंचालकांकडे कारवाईची शिफारस केली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांच्याविरुद्ध असभ्य भाषेची तक्रार अधिसेविकेसह काही परिचारिकांनी राज्य महिला आयोग सदस्य आशा मिरगे यांच्याकडे केली होती. त्याअनुषंगाने अकोला आरोग्य उपसंचालक कार्यालय व राज्य महिला आयोगाने संयुक्तरीत्या निर्णय देऊन चौकशी समिती नेमली होती. यामध्ये राज्य महिला आयोग सदस्य आशा मिरगे, अकोला येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी सुरवाळे, आरोग्य उपसंचालक अविनाश लव्हाळे, राज्य कर्मचारी संघटना सरचिटणीस डी.एस.पवार व नर्सिंग संघटना अध्यक्ष वर्षा पागोटे यांचा सहभाग होता. १६ फेब्रुवारीच्या चौकशीत समितीने परिचारिका व कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले. त्यानुसार अहवाल तयार करून सोमवारी मुंबई येथील आरोग्य संचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आला. राऊत यांचा पूर्वीचा कार्यकाळ बघता ते 'सीएस'पदासाठी सक्षम नाहीत, त्यामुळे त्यांना आस्थापनातील त्याच श्रेणीतील दुसरे पद देण्यात यावे, असभ्य भाषा सुधारण्याचा समज द्यावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)