'ATC' पदासाठी जोरदार स्पर्धा, ‘५०० कोटीं’च्या खुर्चीकरिता मंत्रालयात लॉबिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 05:47 PM2019-07-24T17:47:59+5:302019-07-24T17:51:22+5:30
‘५०० कोटीं’च्या खुर्चीकरिता मंत्रालयात लॉबिंग : आयएस, आदिवासी, वनविभागाचे अधिकारी ठिय्या मांडून
गणेश वासनिक
अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अमरावती येथील अपर आयुक्त पदासाठी जोरदार स्पर्धा सुरू आहे. आयुक्तपदाच्या अखत्यारीतील बजेट हे वार्षिक ५०० कोटींचे आहे. त्यामुळे ही ‘मलाईदार’ खुर्ची कशी काबीज करता येईल, यासाठी काहींनी थेट आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्याकडे साकडे घातले आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने पुन्हा अमरावती येथे ‘नॉन आयएएस’ देण्याच्या वेगवान हालचाली सुरू झाल्याची माहिती पुढे आली आहे.
तत्कालीन अपर आयुक्त पी. प्रदीपचंद्रन यांची नाशिक येथील विभागीय अपर आयुक्त म्हणून बदली झाली आहे. परिणामी गत आठवड्यापासून ‘एटीसी’ पदावर विराजमान होण्यासाठी इच्छुकांनी लॉबिंग चालविली आहे. ही खुर्ची मिळविण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असलेले काही वादग्रस्त अधिकारीदेखील स्पर्धेत आहेत. ज्यांनी यापूर्वी ‘एटीसी’ पदावर कार्यरत असताना वादग्रस्त निर्णय, चुकीच्या लोकांना कंत्राट, महिलांची प्रकरणे अशा विविध कारणांनी ही खुर्ची बदनाम केली आहे. आता हेच अधिकारी आदिवासी विकासमंत्र्यांना हाताशी धरून पुन्हा आदिवासी समाजाच्या हक्कांवर गदा आणण्याचे मनसुबे रचत आहेत.
खुर्ची वादग्रस्त
अमरावती एटीसीपद हे तसेही वादग्रस्त असतेच. मात्र, अगोदरच वादग्रस्त असलेले अधिकारी पदावर येताच मोर्चे, आंदोलनांना वाव मिळतो. अकोला, धारणी, किनवट, औरंगाबाद, कळमनुरी, पुसद, पांढरकवडा अशी सात एकात्मिक प्रकल्प कार्यालये या पदाशी संलग्न आहेत. आदिवासींसाठी योजना, विद्यार्थी शिक्षण, आश्रमशाळांचे नियोजन असे उपक्रम राबविले जातात. मात्र, आतापर्यंत अधिकारी, कंत्राटदार, पुरवठादार गब्बर झाल्याचे वास्तव आहे.
हे आहेत इच्छुक
अमरावती एटीसीपदासाठी नागपूरचे एटीसी संदीप राठोड, आदिवासी विकास विभागातील जात पडताळणी अधिकारी विनोद पाटील व मंत्रालयातील सहसचिव अशोक आत्राम यांच्यासह वनविभागातील दोन अधिकारीसुद्धा स्पर्धेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘आयएएस’ विरुद्ध ‘नॉन आयएएस’
अमरावती अपर आयुक्तपदी ‘नॉन आयएएस’ची वर्णी लागल्यास पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी दोन वर्षांपूर्वी अमरावतीत एटीसी पदावर आयएएस अधिकारी देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार पी. प्रदीपचंद्रन यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता पुन्हा एटीसी पदावर ‘नॉन आयएएस’ अधिकारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
पुसद, पांढरकवडा, धारणी प्रकल्प अधिकारीपद रिक्तच
अमरावती अपर आयुक्त कार्यालय अंतर्गत सात प्रकल्पांपैकी पुसद, पांढरकवडा व धारणी येथील प्रकल्प अधिकारी पदे रिक्त आहेत. धारणी येथे आयएएस अधिकारी योगेश कुंभेजकर यांची नियुक्ती झाली असली तरी ते अद्याप रुजू झाले नाहीत.