राज्यात वनबल प्रमुख पदासाठी जोरदार रस्सीखेच; सुनीता सिंह, शैलेश टेभुर्णीकर यांच्यात चुरस
By गणेश वासनिक | Published: August 20, 2023 04:42 PM2023-08-20T16:42:45+5:302023-08-20T16:55:50+5:30
वनविभागाच्या वनबल प्रमुख पदावर आतापर्यंत उत्तर, दक्षीणेकडील राज्यातील आयएफएस अधिकाऱ्यांना सन्मान मिळालेला आहे.
अमरावती: राज्याच्या वन विभागाचे वनबल प्रमुख वाय.एल.पी. राव हे ऑगस्ट अखेर सेवानिवृत्त होत आहे. राव यांच्या नंतर प्रथमच वनबल प्रमुख पदी मराठी माणूस विराजमान होण्याची शक्यता असताना दुसरीकडे या पदावर वन विभागाच्या ईतिहासात महिला धुरा सांभाळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सुनीता सिंह की शैलेश टेभुर्णीकर? या दोन वरिष्ठ आयएफएस पैकी कोणाची वर्णी लागणार याकडे नजरा लागल्या आहेत.
वन विभागाचा कारभार नागपूर येथील वनबल भवनातून चालतो. आयएएस, आकयपीएस प्रमाणे उपवनसंरक्षक दर्जाचे अधिकारी
आयएफएस कॅडरने नियुक्त केले जातात. पुढे हेच डीएफओ वनसंरक्षक ते प्रधान मुख्य वनसंरक्षक, वनबल प्रमुख पदापर्यंत मजल गाठतात. गृह विभागात पोलिस महासंचालक तर वन विभागात वनबल प्रमुख हे पद समकक्ष असून, प्रत्येक अधिकाऱ्यांना एक वर्षाचा कार्यकाळ मिळतो. राज्याच्या वन विभागाचे सर्वेसर्वा असलेले वनबल प्रमुख पदी सध्या वाय.एल.पी. राव हे ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त होत असल्याने या पदाच्या खुर्चीवर कोणाची वर्णी लागते, याकडे वन विभागातील ‘टॉप टू बॉटम’ अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मराठी की अमराठी कोणाची होणार नियुक्ती?
वनविभागाच्या वनबल प्रमुख पदावर आतापर्यंत उत्तर, दक्षीणेकडील राज्यातील आयएफएस अधिकाऱ्यांना सन्मान मिळालेला आहे. अलीकडे रामबाबू यांच्यानंतर राव हे दक्षिणात्य अधिकारी या पदावर विराजमान झाले. आता राव हे सेवानिवृत्त होत
असताना पहिल्यांदाच वनबल प्रमुखपदी मूळ नांदेड जिल्ह्यातील रहिवासी तसेच सध्या कॅम्पा विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे १९८७ च्या बॅचच्या आयएफएस सुनीता सिंह यांचे नाव देखील पुढे येत आहे. सुनीता सिंह यांच्यापेक्षा शैलेश टेंभुर्णीकर हे सिनिअर असल्याने राज्य शासन टेंभुर्णीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करू शकतात. असे झाले तर वनबल प्रमुखपदी पहिले मराठी अधिकारी ते असतील. तर दुसरीकडे वन्यजीव विभागाचे प्रमुख महिप गुप्ता हे सुद्धा जोर लावत असल्याची माहिती आहे.