उमेदवारांची भाऊगर्दी कमी करण्यासाठी जोरदार हालचाली
By admin | Published: August 21, 2015 12:44 AM2015-08-21T00:44:49+5:302015-08-21T00:51:23+5:30
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी नामनिर्देशन पत्र दाखल केल्यामुळे उमेदवारांची यामध्ये कधी नव्हे एवढी भाऊगर्दी उसळली आहे.
घडामोडी : अमरावती बाजार समिती निवडणूक
अमरावती : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी नामनिर्देशन पत्र दाखल केल्यामुळे उमेदवारांची यामध्ये कधी नव्हे एवढी भाऊगर्दी उसळली आहे. त्यामुळे ही गर्दी कमी करण्यासाठी राजकीय नेत्यांच्या मनधरणीबाबत हालचालींना वेग आला आहे.
जिल्ह्यात सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळखली जाणाऱ्या अमरावती बाजार समितीच्या १८ संचालकपदासाठी येत्या १५ सप्टेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सुमारे २३२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १८ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज ६ आॅगस्ट रोजी पार पडलेल्या छाननीत बाद झाल्याने आता १८६ उमेदवारांचे अर्ज सध्या कायम आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची २७ आॅगस्ट ही शेवटीची मुदत असल्याने या दिवशी यापैकी किती जण माघार घेणार हे याच दिवशी स्पष्ट होणार आहे. मात्र हे जरी खरे असले तरी कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता आपल्या ताब्यात घेण्यासाठी विविध राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांनी जोरदार हालचाली सुरू केले आहेत. अशातच निवडणुकीत उमेदवारांची वाढलेली गर्दी लक्षात घेता यामधून अनेकांना नामांकन अर्ज मागे घेण्यासाठी राजकीय दबाबतंत्राचा व वेगवेगळा फंडा वापरला जात आहे. (प्रतिनिधी)