शासकीय कार्यक्रमात भाजपचे झेंडे लावण्यावरुन संघर्ष

By Admin | Published: November 14, 2016 12:08 AM2016-11-14T00:08:22+5:302016-11-14T00:08:22+5:30

पुलाच्या भुमिपूजनाच्या शासकीय कार्यक्रमात भाजपचे झेंडे लावल्याने युकाँ व भाजपच्या तरूण कार्यकर्त्यांमध्ये उदभवलेल्या वादामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला.

The struggle against the flagging of BJP's flagship program in the government program | शासकीय कार्यक्रमात भाजपचे झेंडे लावण्यावरुन संघर्ष

शासकीय कार्यक्रमात भाजपचे झेंडे लावण्यावरुन संघर्ष

googlenewsNext

शिरजगाव येथील घटना : परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल
तिवसा : पुलाच्या भुमिपूजनाच्या शासकीय कार्यक्रमात भाजपचे झेंडे लावल्याने युकाँ व भाजपच्या तरूण कार्यकर्त्यांमध्ये उदभवलेल्या वादामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला. परिणामी भुमिपूजनस्थळाला आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. याप्रकारानंतर दोन्ही पक्षांनी पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या परस्परविरोधी तक्रारींच्या आधारे पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. ही घटना तालुक्यातील शिरगाव येथे रविवारी घडली.
तालुक्यातील शिरजगाव मोझरी मार्गावरील शिरजगावनजीकच्या बदबदा नाल्यावर पूलाचे बांधकाम करण्याकरिता ८० लाख रूपये मंजूर झाल्याने या पूलाच्या नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन रविवारी पालकमंत्री प्रवीण पोटे व तिवस्याच्या आ. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत होणार होते. मात्र, शासकीय कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे झेंडे पाहून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेतला. यामुळे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व भाजपच्या तरूण ्रकार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली.

पालकमंत्री पोहोचलेच नाहीत
तिवसा : गोंधळ उडाला. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. शासकीय कार्यक्रम असल्याने भाजपचे झेंडे लावण्याचा प्रश्नच नाही, अशी भूमिका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतली. पाहता-पाहता दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. प्रकरण खुर्च्यांची फेकाफाकी, मारामारी व नारेबाजीपर्यंत पोहोचले. हा प्रकार सुरू असतानाच विठ्ठल वाडीभस्मे नामक भाजप कार्यकर्त्याने दगडावर डोके आपटून स्वत:ला जखमी करून घेतले. या प्रकरणानंतर पालकमंत्री कार्यक्रमस्थळी पोहोचलेच नाहीत. त्यानंतर गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा पार पडला. घटनेनंतर तक्रार नोंदविण्यासाठी दोन्ही पक्षांनी तिवसा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी नोंदविलेल्या तक्रारीत भाजप कार्यकर्ते विठ्ठल वाडीभस्मे यांनी यशोमती ठाकूर यांना शिवीगाळ केली व त्यानंतर स्वत:चे डोके दगडावर आपटून जखमी करून घेतले, असे नमूद करण्यात आले आहे. तर भाजप कार्यकर्ते विठ्ठल दौलतराव वाडीभस्मे यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार त्यांना आ. यशोमती ठाकूर व इतर पाच जणांनी त्यांना मारहाण केल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी वाडिभस्मे यांच्या तक्रारीवरून आ. यशोमती ठाकूर व इतर कार्यकर्त्यांविरूद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४,४२७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर यशोमती ठाकूर व वैभव वानखडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जखमी विठ्ठल दौलत वाडीभस्मे, सतीश वाडीभस्मे (रा.शिरजगाव) संजय चांडक, नाटिंगे, मुकेश कठाळेविरूद्ध कलम १४३, १४७, २९४, ३२३, ५०४, ४२७ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास ठाणेदार दिनेश शेळके करीत आहेत.

भाजपचे ‘तिवसा
बंद’ चे आवाहन
तिवसा मतदारसंघातील शिरजगाव मोझरी येथे रविवारी आयोजित पुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात भाजपचे झेंडे लागल्यामुळे आ. यशोमती ठाकूर यांच्या समर्थकांनी भाजपच्या चार कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी पत्रपरिषदेतून केला. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी ‘तिवसा बंद’चे आवाहन करण्यात आले आहे. वाद झाल्यामुळे पालकमंत्री भूमिपूजन सोहळ्यात आले नाहीत, असेही सूर्यवंशी यांनी पत्रपरिषदेतून सांगितले.

संवैधानिक अधिकारानुसार पुलाच्या भूमिपूजनाला मी गेले होते. भाजपचे काही लोक पूर्वनियोजितपणे माझ्यावर हल्ला करण्याच्या बेतात दिसताच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. ७० लाखांच्या कामासाठी असे गढूळ राजकारण करण्याऐवजी भाजपने विकासात्मक कामांसाठी राजकारण करावे.
-यशोमती ठाकूर,
आमदार, तिवसा

दोन्ही पक्षांतर्फे परस्परविरोधी तक्रारी प्राप्त झाल्यात. त्यानुसार दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हे नोंदविले आहेत. पुढील चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल.
- बी.एम.शेळके,
ठाणेदार, तिवसा.

Web Title: The struggle against the flagging of BJP's flagship program in the government program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.