अल्पभूधारक शेतकऱ्याची जगण्यासाठी धडपड
By admin | Published: November 25, 2014 10:49 PM2014-11-25T22:49:17+5:302014-11-25T22:49:17+5:30
मेळघाटातील आदिवासी बांधव कशाप्रकारे जीवन जगताहेत याचा प्रत्यय चाकर्दा येथील ‘दरोगा’ नामक शेतकऱ्यांचे वास्तव जाणून घेतल्यावर दिसून येते. अठराविश्वे दारिद्र्य आणि शिक्षणाची पायरी न
श्यामकांत पाण्डेय - धारणी
मेळघाटातील आदिवासी बांधव कशाप्रकारे जीवन जगताहेत याचा प्रत्यय चाकर्दा येथील ‘दरोगा’ नामक शेतकऱ्यांचे वास्तव जाणून घेतल्यावर दिसून येते. अठराविश्वे दारिद्र्य आणि शिक्षणाची पायरी न चढलेल्या दरोगा पांडू बेठेकर याची रामकहानी ऐकल्यावर त्याचा संसार कसा चालतो याची कल्पनाच न केलेली बरी.
दरोगाच्या वडिलांजवळ सात एकर शेती होती. वडिलांचा मृत्यूनंतर दरोगा व भाऊ बालाजी यांच्यात संपत्तीची वाटणी झाली. प्रत्येकाच्या वाट्याला साडेतीन एकर जमीन आली. दरोगाचे कुटुंबात पत्नी, तीन मुले, तीन सुना आणि सहा नातवांचा संसार असे एकूण १४ व्यक्तींचा मोठा परिवार. सुरूवातीच्या काळात दरोगाने इतरांकडे मोलमजुरीची कामे केली. मुले मोठी झालीत. घरात सुना आल्या आणि नातवांमुळे घर फुलून गेले. मात्र साडेतीन एकर शेतातून संसार चालविणे म्हणजे तारेवरची कसरतच होती. तरीही न डगमगता त्याने आपले अवघे आयुष्य कुटुंबाच्या सावरासावर करण्यात वाहून दिले. आता मुले मोठी झाल्याने त्यांनीही आपापले हिस्से शेतात निर्माण केले. आता साडेतीन एकर शेताचे चार हिस्से पडले आहे. त्यामुळे किमान एक एकरही शेती पदरी नसताना उतारवयात दरोगाला स्वत:चे व पत्नीचे पालनपोषण करावे लागत आहे. शासनाकडून कोणतीही सुविधा नाही. शेताच्या पूर्वेकडून वाहणाऱ्या नाल्याने शेतात खरीपचे पीक हाती येत नव्हते.
मात्र गेल्या वर्षी कृषी विभागाने नाला सरळीकरण व सिमेंट बंधारा बांधण्याची मोहीम राबविली. त्यामुळे शेताला लागूनच सिमेंट बंधाऱ्यात भरपूर पाणी गोळा झाला. आॅईल इंजिनच्या साह्याने शेतात ओलीत सुरू आहे. पहिल्यांदाच यावर्षी रबी हंगामात चांगले उत्पन्न होण्याची आशा दरोगाला आहे. बंधाऱ्याच्या काठावर तुरीचे पीक डौलदारपणे उभे आहे. आता गव्हासाठी शेतीची मशागत झाली आहे.