मिरवणुकीच्या मुद्यावरुन येवद्यात तणाव; एसपी डेरेदाखल

By admin | Published: September 19, 2016 12:09 AM2016-09-19T00:09:48+5:302016-09-19T00:09:48+5:30

गणेश विसर्जनावरून निर्माण झालेला तणाव अखेर रविवारी निवळला. गावातील दोन्ही धर्माच्या नागरिकांनी दाखविलेले सामंजस्य, ...

Struggles in the jurisdiction over the process of procession; SP deedakhal | मिरवणुकीच्या मुद्यावरुन येवद्यात तणाव; एसपी डेरेदाखल

मिरवणुकीच्या मुद्यावरुन येवद्यात तणाव; एसपी डेरेदाखल

Next

अखेर झाले विसर्जन : पोलिसांच्या भूमिकेला गावकऱ्यांचा विरोध 
येवदा : गणेश विसर्जनावरून निर्माण झालेला तणाव अखेर रविवारी निवळला. गावातील दोन्ही धर्माच्या नागरिकांनी दाखविलेले सामंजस्य, पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीमुळे या प्रकारावर पडदा पडला.
स्थानिक एका गणेशोत्सव मंडळाचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष होते. मागील ७५ वर्षांपासून या मंडळाची विसर्जन मिरवणूक येथील छोट्या मशिदीजवळून काढली जाते. इतकेच नव्हे तर गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांचा मुस्लिम समुदायाच्यावतीने गौरवदेखील केला जातो. मात्र, यावेळी पोलिसांनी मशिदीसमोरून एकाचवेळी नऊ गणपती नेण्यास परवानगी नाकारली. मंडळाजवळ एकाच गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची परवानगी असल्याने अन्य आठ गणपती मशिदीसमोरुन जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका पोलिसांनी घेतली. उलटपक्षी मंडळही भुमिकेवर ठाम राहिले. या मंडळाचे नऊही गणपती मशिदीसमोरूनच जातील, अशी भूमिका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती. पोलीस आणि मंडळांचे पदाधिकारी आपापल्या भूमिकेवर अडून राहिल्याने गावात तणावाचे वातावरण होते.
वास्तविक शनिवारीच या मंडळाची विसर्जन मिरवणूक निघणार होती. मात्र, तोडगा न निघाल्याने रविवारी लोकप्रतिनिधींना मध्यस्थी करावी लागली. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलीस अधीक्षक लखमी गौतम येवद्यात डेरे दाखल झाले.

शनिवारी निघालीच नाही मिरवणूक
येवदा : या वादावर शनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत कोणताच तोडगा न निघाल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हे नऊही गणपती पोेलिसांच्या स्वाधिन केले आणि ते घराकडे परतले. परिणामी विसर्जन मिरवणूक शनिवारी निघालीच नाही. गावकऱ्यांमध्ये असंतोष व तणावजन्य स्थिती पाहता रविवारी पहाटेपासूनच गावात पोलिसांचा ताफा व अतिरिक्त कुमक तैनात झाली. गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. हिंदू व मुस्लिम समाजात तेढ निर्माण होऊ नये, याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम स्वत: येवदा येथे तळ ठोकून होते. येवदा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेश पिंपळकर यांनीदेखील संवेदनशील स्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न केलेत.
इतकेच नव्हे, तर संवेदनशील स्थिती लक्षात घेऊन अकोटचे आ.प्रकाश भारसाकळे, दर्यापूरचे आ. रमेश बुंदिले, तहसीलदार राहुल तायडे, उपविभागीय अधिकारी, दर्यापूर इब्राहिम चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी हिरे, सरपंच प्रदीप देशमुख, उपसरपंच नईम जमादार, माजी सरपंच बाळासाहेब राऊत, माजी सरपंच संतोष तिडके, गजानन वाकोडे, बाळासाहेब हिंगणीकर, सुरेखा ठाकरे, सुनील डिके, विजय मेंढे, अरूणा गावंडे, अतुल गोळे, धारणी उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
अखेर एसपी लखमी गौतम यांनी गावातील हिंदू व मुस्लिम समाजातील प्रमुख मान्यवरांच बैठक घेऊन चर्चा केली. चर्चेदरम्यान पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी ग्रामपंचायतीकडून मशिदीसमोरून मिरवणूक काढण्याची लेखी परवानगी घेतल्यानंतर ही मिरवणूक कडेकोट बंदोबस्तात पार पडली. (वार्ताहर)

गावकऱ्यांनी ठेवले
गाव बंद
मशिदीसमोरून एकाच वेळी नऊ गणपतींची मिरवणूक नेण्यास पोलिसांनी मज्जाव केल्यानंतर गावकऱ्यांमध्ये सुप्त असंतोष होता. गणपती पोलिसांच्या हवाली करून शनिवारी गावकरी घरी परतले. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळपासूनच गावकऱ्यांनी या निषेधार्थ स्वयंस्फूर्त बंद ठेवला होता.

गावाला पोलीस छावणीचे स्वरूप
येवदा हे गाव पूर्वीपासूनच संवेदनशिल म्हणून गणले जाते. यावेळीही गणपती विसर्जनाच्या मुद्यावरून तणाव निर्माण झाल्याने कोणताही अनर्थ घडू नये, यासाठी गावात पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात होती. अमरावती राखीव पोलीस दल, दर्यापूर, खल्लार व चिंचोली पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Struggles in the jurisdiction over the process of procession; SP deedakhal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.