पक्षासाठी झटतो, नेतृत्व मोठे करतो, त्याला भेटायला आलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2021 05:00 AM2021-10-24T05:00:00+5:302021-10-24T05:00:55+5:30
ना. वळसे पाटील यांनी येत्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कशी आघाडीवर येईल, याचा कानमंत्र देताना आपसातील हेवेदावे बाजूला सारण्याचे आवाहनही त्यांनी केले. महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे पाच वर्षे पूर्ण करेन, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न, समस्या सोडविले जातील, असा विश्वास त्यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जो कार्यकर्ता पक्षासाठी झटतो, नेतृत्व मोठे करतो, त्याला भेटले पाहिजे. म्हणूनच कोरोना संसर्ग कमी होताच तुमच्या भेटीसाठी आलो आहे. तुमचे प्रश्न, समस्या जाणून घेणार. त्या साेडविल्या जातील, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.
शेगाव नाका स्थित अभियंता भवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित नागरी सत्काराप्रसंगी ते बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष शरद तसरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी मंत्री वसुधा देशमुख, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, वसंत घुईखेडकर, सुरेखा ठाकरे, माजी आमदार केवलराम काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शहराध्यक्ष राजेंद्र महल्ले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, शहराध्यक्ष सुचिता वनवे, रवींद्र गायगाेले, वाहेद खान, अरुण गावंडे, गणेश राय, हेमंत देशमुख, माजी महापौर किशोर शेळके, गणेश राय आदी उपस्थित होते.
ना. वळसे पाटील यांनी येत्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कशी आघाडीवर येईल, याचा कानमंत्र देताना आपसातील हेवेदावे बाजूला सारण्याचे आवाहनही त्यांनी केले. महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे पाच वर्षे पूर्ण करेन, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न, समस्या सोडविले जातील, असा विश्वास त्यांनी दिला.
हर्षवर्धन देशमुख, शरद तसरे, सुरेखा ठाकरे, वसंत घुईखेडकर, सुनील वऱ्हाडे यांनी मनाेगत व्यक्त केले. यावेळी सुरेखा ठाकरे, सुनील वऱ्हाडे, रवींद्र गायगोले, अजय मेहकरे, वसंत घुईखेडकर, चित्रा डहाणे या नवनियुक्त जिल्हा बॅंक संचालकांचा गृहमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांनी केले. संचालन अविनाश मार्डीकर व आभार प्रदर्शन राजेंद्र महल्ले यांनी केले.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संजय खो़डके यांच्या निवासस्थानी स्नेहभोज, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला प्रभारी सुरेखा ठाकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
कार्यालय निर्मितीसाठी पुढाकार
अमरावती येथे विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या निर्मितीसाठी यशस्वी पुढाकार घेतला जाईल, असे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. पोलिसांनी कोरोना काळात चांगली कामगिरी बजावल्यामुळे येत्या काळात त्यांच्या समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी भरीव कार्य करण्याचे अभिवचन त्यांनी दिले.
राष्ट्रवादीच्या अडचणींचा सारथी
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीतील सारथी असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांनी काढले. ज्या पदावर त्यांनी काम केले, त्याला न्याय देण्याची भूमिका बजावली. आता गृहमंत्रालय त्यांच्या कामगिरीने झळाळून निघेल, असा आशावाद खोडके यांनी व्यक्त केला.