कुपोषित नीरजाला वाचवण्याची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:16 AM2021-08-13T04:16:52+5:302021-08-13T04:16:52+5:30
फोटो - जावरे फोल्डर फोटो कॅप्शन : ढगफुटी वाहून गेलेला रस्ता त्यातून जाणारी रुग्णवाहिका आणि चिमुकली गिरजा) लोकमत विशेष ...
फोटो - जावरे फोल्डर
फोटो कॅप्शन : ढगफुटी वाहून गेलेला रस्ता त्यातून जाणारी रुग्णवाहिका आणि चिमुकली गिरजा)
लोकमत विशेष
नरेंद्र जावरे - चिखलदरा (अमरावती) : मध्यप्रदेशात सासरी प्रसूती झाल्यानंतर चिमुकल्या नीरजाला घेऊन तिची आई अडीच महिन्यानंतर माखला येथे माहेरी आली. गिरजा अत्यंत कमी वजनाची, तीव्र कुपोषित श्रेणीतील. गावातील आरोग्य परिचारिका व अंगणवाडी सेविकांनी भेट देऊन दवाखान्यात दाखल करण्याची विनंती केली. मात्र, आईचा नकार कायम होता. नीरजाला वाचविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने कुटुंबीयांची मनधरणी केली. यानंतर ढगफुटीने वाहून गेलेल्या रस्त्याने खडतर प्रवास करीत तिला वैद्यकीय सेवा उपलब्ध केली.
सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत माखला येथील १९ वर्षीय वनमालाचा विवाह मध्यप्रदेशच्या भैसदेही तालुक्यातील कसाई येथे गतवर्षी झाला. वनमालाची अडीच महिन्यांपूर्वी प्रसूती झाली. तिने नीरजा नामक चिमुकलीला जन्म दिला. मंगळवारी ती अडीच महिन्याच्या नीरजाला घेऊन माखला येथे माहेरी आली. गावात येताच अंगणवाडी सेविका ज्योती सोमदे, आरोग्य सेविका सिंधू सावरकर यांनी चिमुकल्या नीरजाची तपासणी केली आणि तीव्र कुपोषित असल्याची माहिती आरोग्य केंद्रातील डॉक्टर महेश कूर्तकोटी, डॉ. दीपक कुंडेटकर, डॉ. सुषमा इंगोले यांना दिली. नीरजा मध्य प्रदेशातील असली तरी तिला वाचवण्यासाठी आरोग्य विभागाचे ऑपरेशन शब्दश: वाहून गेलेल्या रस्त्यावरून सुरू झाले.
-------------------
घरात ठेवले लपवून
तीव्र कुपोषित नीरजाला वाचवण्यासाठी डॉ. दीपक कुंडेटकर, समुपदेशक शिवदास बिसंदरे, चंद्रकला मावस्कर, आरोग्य सहायक काळे, आशा ललिता मावस्कर, कला मनानसिंग जावरकर, पोलीस पाटील शिवकली सेलूकर, चालक समीर शेख यांनी बुधवारी दुपारी १२ वाजताच माखला गाठले. वनमालाची सायंकाळपर्यंत मनधरणी झाली. परत गुरुवारी सकाळी ८ वाजता ही चमू गेली. तेव्हा दोन्ही मायलेकींना घरात लपवून ठेवण्यात आले आणि शेतात गेल्याचे सांगण्यात आले.
-------------------
वाहून गेलेला रस्ता आणि रुग्णवाहिकेची बिकट वाट
मेळघाटात २२ जुलै रोजी ढगफुटी झाली. या रस्त्यावर दीड किलोमीटरपर्यंत कोसळलेल्या दरडीमुळे जीवघेण्या ठरलेल्या सेमाडोह मार्गाने प्रवासाचा धोका पत्करून आरोग्य यंत्रणा गाव गाठले. या मार्गात धोकादायक ठिकाणी झेंडे लावण्याशिवाय काहीही केलेले नाही. दोन दिवस डॉक्टरांची चमू याच मार्गाने माखला गावाला गेली. तेथून सेमाडोह आरोग्य केंद्र आणि धारणी उपजिल्हा रुग्णालयातील बाल संगोपन केंद्रात नीरजाला दाखल करण्यात आले. डॉ. जावरकर उपचार करीत आहे.
----------------------
अडीच वर्षीय नीरजाला धारणी उपजिल्हा रुग्णालयात बाल संगोपन केंद्रात दाखल करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टर तिच्यावर लक्ष ठेवून आहेत. रुग्णांच्या जीविताची काळजी घेण्यासाठी जिवाचा थरकाप उडविणाऱ्या रस्त्याने आरोग्य यंत्रणेला जावे लागत आहे.
- दीपक कुंडेटकर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, सेमाडोह