एसटीची मालवाहतुक महागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:09 AM2021-07-04T04:09:46+5:302021-07-04T04:09:46+5:30
अमरावती : इंधनाच्या सातत्याने वाढत असलेल्या किमती कोरोनाच्या संकटामुळे मर्यादित स्वरूपात असणारी प्रवासी वाहतूक यामुळे मेटाकुटीला आलेल्या एसटी महामंडळाने ...
अमरावती : इंधनाच्या सातत्याने वाढत असलेल्या किमती कोरोनाच्या संकटामुळे मर्यादित स्वरूपात असणारी प्रवासी वाहतूक यामुळे मेटाकुटीला आलेल्या एसटी महामंडळाने मालवाहतुकीत प्रतिकिलोमीटर २ रुपयांची भाडेवाढ केली आहे.
कोरोनाचे संकट रोखण्यासाठी लॉकडाऊन काळात एसटीची चाके थांबली होती. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात झाली. परंतु, आता कोरोनाबाबतच्या निर्बंधात फारसा बदल झालेला नाही. प्रवासी संख्येची मर्यादा घालण्यात आल्यामुळे एसटीलादेखील आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हते. संकट हीच संधी समजून एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना सुरू केली आणि यातूनच मालवाहतुकीवर भर देण्याचे ठरविले. यात त्यांना यशही आले. जिल्ह्यात सुरुवातीला १० ते १५ एसटी बसने मालवाहतूक सुरू केली. त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत गेला. त्यानुसार मालवाहतुकीच्या एसटींची संख्याही वाढविण्यात आली. जिल्ह्यात एसटीच्या मालवाहतुकीच्या २० ते २५ गाड्या आहेत. गत वर्षभरापासून इंधनाचे दर सतत वाढत आहे. त्यामुळे मालवाहतुकीने एसटीला तारले असले तरी इंधनाच्या वाढत्या दरामुळे त्यातून फारसा लाभ होत नव्हता. त्यामुळे मालवाहतुकीच्या दरात वाढ करण्याचा विचार सुरू होता. त्यामध्ये सरासरी दोन रुपये प्रतिकिलो मीटरने वाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. स्थानिक वाहतुकीसाठी ३५०० रुपये किमान दर ठेवण्यात आला आहे. त्यात मात्र कोणताही बदल केलेला नाही.
बॉक्स
अंतर पूर्वीचे दर, वाढलेले दर प्रतिकिलोमीटरसाठी
१०० किलोमीटर ४६ ४८
१०१ ते २५० किलोमीटर ४४ ४६
२५१ च्यापुढे किलोमीटर ४२ ४४
कोट
मालवाहतुकीच्या भाड्यात थोडी वाढ झाली असली तरी खासगी वाहतुकीच्या तुलनेत जास्त वाढ केली नाही. मालवाहतुकीचा दर अद्यापही खूपच कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी याचा फायदा घ्यावा.
- श्रीकांत गभने,
विभाग नियंत्रक