एसटीची आंतरजिल्हा बस सेवा बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:11 AM2021-06-04T04:11:06+5:302021-06-04T04:11:06+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आल्यानंतर मंगळवार, १ जूनपासून काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. सार्वजनिक वाहतुकीला ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आल्यानंतर मंगळवार, १ जूनपासून काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. सार्वजनिक वाहतुकीला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागातून केवळ अत्यावश्यक सेवेसाठी नागपूर, यवतमाळ आणि अकोला या जिल्ह्यांचा अपवाद वगळता इतर आंतरजिल्हा प्रवासी बससेवा बंदच आहे. सध्या सुरू असलेल्या तीन शहराच्या बससेवेचे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या दीड महिन्यापासून एसटीची प्रवासी सेवा बंद होती. निर्बध शिथिल केल्यानंतर एसटी बसेस पुन्हा रस्त्यावर धावतील, अशी अपेक्षा होती. मात्र जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक वाहतुकीवरील बंदी कायम ठेवल्याने एसटी बसेस उभ्या आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह वैद्यकीय उपचारासाठी ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी बसमध्ये प्रवेश दिला जात आहे. सध्या ५० टक्के क्षमतेने बसेस धावत आहे. दरम्यान सव्वा वर्षांपासून एसटीचे प्रवासी वाहतूक सेवा ठप्प आहे. लवकर लॉकडाऊन हटविण्याची शक्यता असल्याने लालपरी प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज ठेवण्यात आली आहे. या अनुषंगाने बसगाड्यांच्या निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आल्याचे एसटी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बॉक्स
जिल्ह्यांतर्गत धावताहेत बसेस
आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीला बंदी कायम असली म तरी जिल्हा अंतर्गत लालपरी धावत आहे. त्यातही शासकीय निकषाप्रमाणे अत्यावश्यक सेवेसाठी मध्यवर्ती बस स्थानक अन्य बस आगारात मधून बसेस सोडण्यात येत आहे. सध्या बस गाड्यांची संख्या कमी असून टप्प्याटप्प्याने फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.