महापौरांच्या दालनात ठिय्या
By admin | Published: December 31, 2015 12:09 AM2015-12-31T00:09:19+5:302015-12-31T00:09:19+5:30
येथील सायन्सकोर मैदानावर जागोजागी खड्डे पडले असताना ते दुरुस्त करण्यात येत नसल्याच्या कारणामुळे लार्ड बुद्धा मैत्री संघाच्या कार्यकर्त्यानी चक्क ....
सायन्सकोर मैदानाचा विषय : कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा
अमरावती : येथील सायन्सकोर मैदानावर जागोजागी खड्डे पडले असताना ते दुरुस्त करण्यात येत नसल्याच्या कारणामुळे लार्ड बुद्धा मैत्री संघाच्या कार्यकर्त्यानी चक्क महापौरांच्या दालनात बुधवारी तासभर ठिय्या आंदोलन केले. अखेर या प्र्रकरणी महापौर चरणजित कौर नंदा यांना हस्तक्षेप करावा लागला. दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
लॉर्ड बुद्धा मैत्री संघाच्या वतीने येथील सायन्सकोर मैदानावर १ ते ३ जानेवारी दरम्यान भिमाकोरेगाव विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या मैदानावर जागोजागी खड्डे पडले असताना ते दुरुस्त करण्यासाठी रोड रोलरची सतत मागणी करण्यात आली. एवढेच नव्हे तर सायन्सकोर मैदानावर पडलेल्या खड्ड्यांबाबत महापौरांच्या स्वीय सहायकांनी अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांशी सतत संपर्क साधला. मात्र महापौर कार्यालयातून जाणाऱ्या संदेशाला देखील कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही, असा आरोप लार्ड बुद्धा मैत्री संघाने केला. सायन्सकोर मैदानावर अन्य संघटनांच्या होणाऱ्या कार्यक्रमांना महापालिका प्रशासन आवश्यक त्या सुविधा पुरवितात. परंतु दरवर्षी भिमाकोरेगाव विजयस्तंभाला मानवंदना देणाऱ्या कार्यक्रमाप्रसंगी प्रशासननकडून सतत नकारात्मक भूमिका घेतली जाते, असा आरोप करण्यात आला. यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांच्या नकारात्मक कामकाजाचा पाढा वाचताना दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय महापौरांचे दालन सोडणार नाही, अशी भूमिका लॉर्ड बुद्धा मैत्री संघाच्या कार्यकर्त्यानी घेतली. यावेळी महापौर चरणजित कौर नंदा, नगरसेवक अजय गोंडाने, निलिमा काळे, उपायुक्त चंदन पाटील आदींनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
मात्र आंदोलक भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश कुत्तरमारे, निरिक्षक उमेश सवाई यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांना कारणेदाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय महापौर नंदा यांच्या निर्देशानुसार उपायुक्त चंदन पाटील यांनी घेतला. ठिय्या आंदोलन करताना कैलास मोरे, साहिल वानखडे, रवी गवई, लता खंडारे, नलिनी मेश्राम, सुमती गवई, संगीता जेठे, निर्मला गजभिये, सुनंदा भिलावे आदी उपस्थित होते.