पन्नास ते साठ गुणांचे पेपर सोडवूनही शून्य गुण; विद्यार्थ्यांची विद्यापीठावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 06:39 PM2020-02-03T18:39:21+5:302020-02-03T18:40:53+5:30
विद्यार्थ्यांचा मूल्यांकनावर आक्षेप
अमरावती : एम.एस्सी. प्रथम वर्ष सेमिस्टर पॅटर्न हिवाळी २०१९ परीक्षेत गणित विषयात विद्यार्थ्यांना गुण कमी अथवा काहींना शून्य गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांनी मूल्यांकनावरच आक्षेप घेतला आहे. सोमवारी एम.एस्सी.च्या असंख्य विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर धडक देत प्र-कुलगुरू, कुलसचिव आणि परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालकांची भेट घेत आपबिती कथन करत ठिय्या मांडला. ६० ते ७० गुणांचे पेपर सोडविले असताना शून्य अथवा ५, १० गुण कसे, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, विद्याभारती महाविद्यालय, नरसम्मा महाविद्यालय, अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभागात एम.एस्सी.ला प्रवेशित गणित विषयांच्या विद्यार्थ्यांचा त्यात सहभाग होता. एनएसयूआयने एम.एस्सी. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी पुढाकार घेतला. गणित विषयाच्या टोपोलॉजी, अॅडव्हॉन्स अॅबस्ट्रॉक पेपरमध्ये मिळालेले गुण फारच कमी आहे. काही विद्यार्थ्यांनी ५० ते ६० गुणांचे प्रश्न सोडविले असताना शून्य गुण कशाच्या आधाराने देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन होत असल्याचा आक्षेप घेतला. स्थानिक शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील प्रियंका उंबरकर या विद्यार्थिनीला अॅडव्हॉन्स अॅबस्ट्रॉक पेपरमध्ये केवळ १ गुण मिळाल्याची उत्तरपत्रिका निवेदनासोबत जोडली आहे. हिवाळी परीक्षेचे निकाल जाहीर होत असताना एम.एस्सी. गणित विषयात कमी गुण मिळाल्याची ओरड सुरू झाल्याने मूल्यांकनात नेमक्या कोणत्या त्रुटी राहिल्या, याकडे नजरा लागल्या आहेत. विद्यार्थ्यांसोबत एनएसयूआयचे प्रदेश सचिव संकेत बोके, युवक काँग्रेसचे नीलेश व्यवहारे, आदित्य साखरे, सूरज अढाळक, अनिकेत सातपुते यांच्यासह विद्यार्थ्यांनी मूल्यांकनावर आक्षेप घेतला.
दोन दिवसांत फेरतपासणीचे अर्ज सादर केले जाणार आहे. १० दिवसांत एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याबाबत निर्णय झाला आहे. यात विद्यापीठाने विद्यार्थ्यांवर अन्याय केला, तर याचे तीव्र पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही.
- संकेत बोके, प्रदेश सचिव, एनएसयूआय.
एम.एस्सी. प्रथम वर्ष गणित विषयाचे १५ फेब्रुवारीपर्यंत पुनर्मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांना ६ फेब्रुवारीपर्यंत फेरतपासणीसाठी अर्ज सादर करावे लागतील. गणित विषयाचा सरासरी निकाल चांगला असतानाही विद्यार्थ्यांच्या मागणीची पूर्तता करण्यात येईल.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ