एका विद्यार्थ्याला मिळाली चक्क दोन आधार कार्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 01:24 AM2018-01-09T01:24:58+5:302018-01-09T01:25:10+5:30
तालुक्यातील अंबाडा येथील एका विद्यार्थ्याला दोन वेगवेगळ्या क्रमांकांची आधार कार्डे घरपोच मिळाली आहेत. आधारसाठी आवश्यक सर्व गोष्टी ‘युनिक’ असताना, हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
- गोपाल डाहाके
मोर्शी (अमरावती) : तालुक्यातील अंबाडा येथील एका विद्यार्थ्याला दोन वेगवेगळ्या क्रमांकांची आधार कार्डे घरपोच मिळाली आहेत. आधारसाठी आवश्यक सर्व गोष्टी ‘युनिक’ असताना, हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मोर्शी तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावरील अंबाडा येथे संचित वासुदेव वानखडे या सहा वर्षांच्या मुलाच्या घरी त्याची वेगवेगळ्या क्रमांकांची दोन आधार कार्डे पोहोचली आहेत. आता शासकीय कामात कोणते आधार कार्ड वापरावे, असा प्रश्न त्याच्या पालकांना पडला आहे.
संचितची ३१ आॅगस्ट २०१६ रोजी मोर्शी येथील आठवडी बाजार परिसरातील सेतू केंद्रात आधार कार्डसाठी नोंदणी केली होती.
त्याची माहिती केवळ एकदाच नोंदविण्यात आली. मात्र त्याला नामांकन दोन वेळा प्राप्त झाले. परंतु आधार कार्ड एकच मिळेल, असे सांगण्यात आल्याने संचितच्या पालकांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते.
स्कॉलरशिप, बँक खाते नाही
संचित अंबाडा येथील जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्गाचा विद्यार्थी आहे. त्याच्या पालकांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील शिष्यवृत्तीकरिता अर्ज केला.
मात्र, त्याचे दोन्ही आधार क्रमांक बायोमेट्रिक पद्धतीने लिंक होत नाहीत. त्यामुळे तो बँक खातेही उघडू शकलेला नाही. त्यामुळे त्याची शिष्यवृत्तीही रखडणार आहे.
दोन्ही आधार क्रमांकांमुळे या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती रखडणार असल्याने त्याच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
एनआयसीने ठरवून दिलेल्या आधार केंद्राला मदत करणे, जास्तीतजास्त आधार कार्ड बनविणे व देखरेख ठेवणे ही कामे आमच्याकडे आहेत. तांत्रिकदृष्ट्या बायोमेट्रिकबद्दल माहिती आमच्याकडे नाही.
- अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार, मोर्शी