विद्यार्थ्यांनो, सखोल वाचनाचे व्यसन जोपासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 12:30 AM2017-10-05T00:30:15+5:302017-10-05T00:30:59+5:30
नवीन पिढी विभक्त कुटुंब व्यवस्थेत जीवन जगत आहे. संस्कार दुर्मिळ झाले आहेत. विद्यार्थ्यांनी पुस्तकांऐवजी मोबाईल फोन हातात घेतला आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढलेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : नवीन पिढी विभक्त कुटुंब व्यवस्थेत जीवन जगत आहे. संस्कार दुर्मिळ झाले आहेत. विद्यार्थ्यांनी पुस्तकांऐवजी मोबाईल फोन हातात घेतला आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढलेली आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी फेसबुक व व्हाट्सअॅपच्या आहारी जाण्याऐवजी सखोल वाचनाचे व्यसन जोपासावे. वाचाल तर वाचाल हा शिक्षण तज्ज्ञांचा सल्ला आत्मसात करावा, असे प्रतिपादन सामाजिक कीर्तनकार तुषार सुर्यवंशी यांनी केले.
एकवीरा माता मंदिर परिसरात आयोजित कीर्तन कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रामगीता ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाजाला व प्रामुख्याने शेतकरी बांधवांना दिलेली मौल्यवान देणगी आहे. त्या ग्रंथात जन्मापासून मृत्यूपर्यंत करावयाच्या संस्कारांचा खजिना आहे. तो लुटण्याचा प्रयत्न करण्याऐवजी युवा पिढी भरकटत चालली आहे. त्यामुळे मूल्यशिक्षण व संस्काराला फार महत्व आलेले आहे. लोकसंख्या अफाट वाढलेली असतांना राष्ट्रसंतांना माणूस द्या मज माणूस द्या, अशी हाक द्यावी लागली. यावरून जनतेने माणूस कोण हे समजून घेण्याची गरज आहे. अंधश्रद्धा तर फोफावत चाललेली आहे. स्वत:ला सुशिक्षित समजणारा समाज बुआ-बाबांच्या मागे लागलेला आहे. दारात आलेला गरजू भिकारी उपाशी पोटी परत पाठविणारे लोक ऐतखाऊ बाबा लोकांना लाखो रुपये देणगी देतांना दिसतात यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. युवा पिढीतील सप्त खंजेरी वादक कीर्तनकार म्हणून तुषार सुर्यवंशी उदयास आले आहेत. कीर्तन ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.