विद्यार्थी, खेळाडूंना शालेय क्रीडा स्पर्धा सुरू होण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:16 AM2021-09-17T04:16:50+5:302021-09-17T04:16:50+5:30
फोटो - मैदानाचा फोटो घेणे गोपाल डहाके मोर्शी : कोरोनाकाळात बंद झालेली क्रीडांगणे दोन वर्षांपासून ओस पडली असून विद्यार्थी, ...
फोटो - मैदानाचा फोटो घेणे
गोपाल डहाके
मोर्शी : कोरोनाकाळात बंद झालेली क्रीडांगणे दोन वर्षांपासून ओस पडली असून विद्यार्थी, खेळाडूंना शालेय क्रीडा स्पर्धा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. मैदानांवरील निर्बंध खुले होण्याकडे युवा वर्गाचा डोळा लागला आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने दरवर्षी जुलै ते डिसेंबर दरम्यान इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थी खेळाडूंसाठी १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुलामुलींच्या तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय शालेयस्तरीय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केल्या जातात. त्या स्पर्धांतून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडत असतात. गतवर्षापासून कोविड-१९ या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य व देशातील सर्वच शाळा-महाविद्यालये बंद असल्याने शालेय मैदाने ओस पडले असून दोन वर्षांपासून कोणत्याही प्रकारच्या शालेय किंवा संघटनांच्या क्रीडा स्पर्धा होऊ शकल्या नाहीत.
सद्यस्थितीत हळूहळू सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत असून काही भागात शाळासुद्धा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धा सुरू करण्याची मागणी विद्यार्थी, पालक, क्रीडा शिक्षक व विविध क्रीडा संघटनांच्यावतीने करण्यात येत आहे. याबाबत मोर्शी तालुका शालेय क्रीडा स्पर्धांचे संयोजक श्रीकांत देशमुख यांच्याशी संपर्क केला असता, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत सांघिक खेळाऐवजी वैयक्तिक खेळ सुरू करण्यास हरकत नसल्याचे ते म्हणाले.