दप्तरांचे ओझे विद्यार्थी अन् मुख्याध्यापकांवरही!
By admin | Published: November 30, 2015 12:28 AM2015-11-30T00:28:42+5:302015-11-30T00:28:42+5:30
शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी दिलेली ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत आज संपुष्टात येणार आहे.
आजची डेडलाईन : संघटनांकडून नाराजीचा सूर
अमरावती : शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी दिलेली ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत आज संपुष्टात येणार आहे. त्यामुळे डिसेंबरच्या पूर्वार्धात समारंभ कारवाईच्या भीतीने मुख्याध्यापकांचे ‘हार्ट-बिट’ वाढणार आहे.
राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर वाढलेले दप्तराचे अनाठायी ओझे कमी करण्यासाठी राज्य शासनाने मुख्याध्यापकांना ३० नोव्हेंबरची मुदत दिली होती. दिवाळीच्या सुटीनंतर प्राथमिक शाळा सुरू झाल्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी कडक पावले उचलावित, असे निर्देश राज्य शासनाने दिले होते. २१ जुलैला शासन निर्णय काढून विविध उपाययोजनाही सुचविल्या होत्या. तथापी अद्यापही मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी न झाल्याने मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाणार आहे. याबाबत मुख्याध्यापकांकडून विरोधही होत आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत दप्तराचे ओझे कमी करण्यावर उपाययोजना न केल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व नियामक मंडळाने ठरविलेल्या संचालकावर कारवाई केली जाणार असल्याचे परिपत्रक काढण्यात आले होते. या परिपत्रकानुसार दिलेली मुदत सोमवारी संपुष्टात येणार असल्याने मुख्यध्यापकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)