मराठीतून विद्यार्थ्यांना घेता येणार वैद्यकीय शिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 10:56 AM2024-10-10T10:56:55+5:302024-10-10T10:57:59+5:30
Amravati : पीएम नरेंद्र मोदी यांनी केले 'मेडिकल'चे ऑनलाइन उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीमुळे वैद्यकीय शिक्षण घेण्यास इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच आता येथे प्रवेशित विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून देखील वैद्यकीय शिक्षण घेता येणार असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. प्रवेश प्रक्रियेसाठी मान्यता मिळालेल्या राज्यातील दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन बुधवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. यामध्ये अमरावती वैद्यकीय महाविद्यालयाचा देखील समावेश आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे ते उद्घाटन करण्यात आले. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन नियोजन भवनात करण्यात आले होते. यावेळी खा. डॉ. अनिल बोंडे, आ. रवी राणा, आ. प्रताप अडसड, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, अपर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, डॉ. अनिल बत्रा, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर उपस्थित होते. नव्याने निर्माण होणारे वैद्यकीय महाविद्यालय लाखो परिवारांचे सेवेचे केंद्र ठरणार असल्याचे पीएम नरेंद्र मोदी म्हणाले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ऑनलाइन उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. यानंतर काही वेळाने आमदार रवी राणा यांनी या वैद्यकीय महाविद्यालयातील व त्याला संलग्न ४३० खाटांच्या रुग्णालयासाठी मंजूर करण्यात आलेल्या आलियाबाद येथील शासकीय जागेवर भूमिपूजन कार्यक्रमही पार पडला.