विद्यार्थ्यांनी जाणली मूलभूत विज्ञानाची संकल्पना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 10:56 PM2017-11-22T22:56:30+5:302017-11-22T22:57:10+5:30
मूलभूत विज्ञानाचे क्षेत्र अतिशय आव्हानात्मक आणि विलक्षण बौद्धिक आनंद देणारे आहे. मूलभूत वैज्ञानिक संशोधनामध्ये विश्वातील घडामोडी कशामुळे होतात, का होतात, याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जातो.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : मूलभूत विज्ञानाचे क्षेत्र अतिशय आव्हानात्मक आणि विलक्षण बौद्धिक आनंद देणारे आहे. मूलभूत वैज्ञानिक संशोधनामध्ये विश्वातील घडामोडी कशामुळे होतात, का होतात, याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. तोच धागा पकडून विद्यार्थ्याना मूलभूत विज्ञानाचे धडे देण्याचा संकल्प ‘थिंक शाश्वत’ ग्रुपने केला आहे. त्यासाठी शाश्वत कन्सेप्ट स्कूलने विज्ञान प्रदर्शनाची संकल्पना मांडून ते बुधवार (२२ नोव्हेंबर) पासून प्रत्यक्षात साकारले. या संकल्पनेला शहरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कॅम्प स्थित शाश्वत स्कूलच्या आवारात बुधवारी दुपारी जि.प. शिक्षण सभापती जयंत देशमुख यांनी या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केले. शहरातील खासगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या खांद्यास खांदा लावून जि.प. शाळांमधील विद्यार्थ्यांनी साकारलेले शंभराहून अधिक मूलभूत विज्ञानाचे प्रयोग लक्षवेधक ठरले. मूलभूत विज्ञान कधीच टाकाऊ नसते, हे वेैश्विक पटलावर सिद्ध झाले आहे. त्याअनुषंगाने मंदिरातील घंटानाद का करतो, मानवप्राण्यांचे हृदय कसे धडधडते, जनरेटरमधून वीजनिर्मिती नेमकी कशी होते, याचे उत्तर या प्रदर्शनातून अगदी सोप्या व सुलभ पद्धतीने देण्याचा स्तुुत्य प्रयत्न करण्यात आला आहे. विविध शाळांमधून आलेले शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सान-थोरांना मूलभूत ‘कोअर’ सायन्सचे धडे दिलेत. २५ नोव्हेंबरपर्यंत हे विज्ञान प्रदर्शन सकाळी ११ ते ७ या वेळेत अमरावतीकरांना अनुभवता येणार आहे.
प्रदर्शनाला खासकरून उपस्थित असलेले होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे निवृत्त वैज्ञानिक आनंद घैसास यांनी विज्ञानाचे प्रयोग साकारणाºया विद्यार्थ्यांशी आत्मीय संवाद साधला. शिक्षणाधिकारी नीलिमा टाके, उपशिक्षणाधिकारी जयश्री राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव धनंजय धवड, प्रसिध्द मूर्तिकार अतुल जिराफे, गणेश वºहाडे यांनी भेट दिली. श्रीकांत बाभूळकर, सचिन सावळे, पंकज उभाड, प्रशांत खोपेकर, शाश्वत शाळेचे संचालक अतुल गायगोले, अमृता गायगोले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सेवानिवृत्त वनकर्मचारी सेवक संघाचा ५० पेक्षा अधिक औषधीयुक्त वनस्पतींचा स्टॉलही लक्षवेधक ठरला.
हे आहेत आगळेवेगळे प्रयोग
होल इन द हँड, पार्टिशन आॅफ व्हिजन, साऊंड फॉर्मेशन अॅन्ड फ्रिक्शन, हॉर्ट बिट, साऊंड वेव्ह्ज, सेंटर आॅफ ग्रॅव्हिटी, मिनी इलेक्ट्रिसिटी जनरेशनसह शेकडो प्रयोगाची इत्थंंभूत माहिती अत्यंत सोप्या न सुलभ भाषेतून देण्यात आली. अशा प्रकारचे विज्ञान प्रदर्शन पहिल्यांदाच अनुभवल्याची प्रतिक्रिया भेट देणाºयांनी व्यक्त केली.
डिसेक्शन आॅफ हार्ट
बकरी आणि बकºयाच्या हृद्यातील आंतरिक भाग ‘डिसेक्शन आॅफ हार्ट’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. बकरी प्रजातीतील प्राण्यांच्या हृद्यातील आंतरिक भागांची ओळख करवून देण्यात आली. हृदयाची धडधड करणारी कार्डियाक टिश्यू, चार कप्पे, आर्टेरी दाखविण्यात आली.