शिक्षकांच्या बेपर्वाईमुळे विद्यार्थी बेपत्ता
By admin | Published: April 25, 2016 12:08 AM2016-04-25T00:08:53+5:302016-04-25T00:08:53+5:30
जि. प. शाळेतील मुख्याध्यापक आणि सहायक शिक्षकाच्या बेपर्वाईमुळे शाळा ओस पडल्याचा प्रकार शनिवारी सकाळी ७.२० मिनिटाला धाराकोट येथे पाहावयास मिळाला.
धाराकोट शाळेतील प्रकार : ४३ पैकी केवळ ३ विद्यार्थी, ९ विद्यार्थ्यांना एनजीओने केले हायजॅक, उर्वरित बेपत्ता
धारणी : जि. प. शाळेतील मुख्याध्यापक आणि सहायक शिक्षकाच्या बेपर्वाईमुळे शाळा ओस पडल्याचा प्रकार शनिवारी सकाळी ७.२० मिनिटाला धाराकोट येथे पाहावयास मिळाला. त्यामुळे मेळघाटातील शिक्षक आपल्या कर्तव्यात किती दक्ष आहेत याचा अनुभवच मिळाला.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने जि. प. शाळेचा कालावधी सकाळी करण्यात आले. त्यानुसार शिक्षक व मुख्याध्यापकांनी आपापल्या शाळेत सकाळी ६.५० वाजता पोहोचण्याची व सकाळी ११.५० वाजता जाण्याची वेळ ठरविण्यात आली आहे. सकाळी ७ वाजता प्रार्थना व नंतर परिपाठ झाल्यावर ७.३० ते ११.३० पर्यंत शाळेची शिक्षणाची वेळ आहे. मात्र याकडे मेळघाटात कार्यरत मुख्याध्यापक व शिक्षक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना किंवा अॅडजस्टमेंट करतानाचे चित्र आहे.
शनिवार दि. २३ एप्रिल रोजी प्रस्तुत प्रतिनिधीने आज सकाळी ७.१५ दरम्यान जि. प. प्राथमिक शाळा धाराकोट येथे भेट दिली असता मुख्याध्यापक किराणा दुकानावर गेल्याचे व सहाय्यक शिक्षक शाळेच्या मागे टाईमपास करीत उभे होते. कार्यालय व वर्ग खोल्या उघड्या होत्या.
पहिल्या वर्गात केवळ एक विद्यार्थिनी बेंचवर बसली होती तर दुसरा वर्ग रिकामा होता. नंतर आणखी दोन विद्यार्थी पोहोचले. शाळेची पटसंख्या ४३ तर वर्ग १ ते ४ चे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ९ विद्यार्थी गावातील एका घरात अपेक्षा होमिओ सोसायटीद्वारे चित्रकला काढण्यात व्यस्त होते. उर्वरीत विद्यार्थी बेपत्ता असल्याचे चित्र ७.३० पर्यंत होते. (तालुका प्रतिनिधी)
शिक्षकांवर कारवाईची मागणी
विद्यार्र्थ्यांना वाऱ्यावर सोडून खासगी कामात व्यस्त असणाऱ्या शिक्षकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी धारणी येथील शिस्तप्रिय नागरिकांनी केली आहे. मेळघाटात कार्यरत शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्याकडे कमी लक्ष देतात आणि आपले खासगी काम तसेच गप्पा मारण्यात व्यस्त असतात असा आरोपही विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. यामुळेच शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत मेळघाटातील विद्यार्थी गुणवत्तेच्या बाबतीत मागे राहात आहे.