आता विद्यार्थ्यांना सहा सेमिस्टरपर्यंत परीक्षेत एकच आसन क्रमांक; अमरावती विद्यापीठाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 07:16 PM2021-11-12T19:16:19+5:302021-11-12T19:17:17+5:30
Amravati News संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहा सेमिस्टरपर्यंत परीक्षांमध्ये एकच आसन क्रमांक असणार आहे. हिवाळी २०२१ या परीक्षांपासून या नावीन्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहा सेमिस्टरपर्यंत परीक्षांमध्ये एकच आसन क्रमांक असणार आहे. हिवाळी २०२१ या परीक्षांपासून या नावीन्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. परीक्षा विभागाने त्याअनुषंगाने तयारी चालविली आहे.
अमरावती विद्यापीठ अंतर्गत ३७२ महाविद्यालयात सुमारे पाच लाख विद्यार्थी संख्या आहे. दरवर्षी दीड ते पावणे दोन लाख नव्याने विद्यार्थी प्रवेशित होतात. मात्र, प्रत्येक परीक्षेच्या वेळी आसन क्रमांक बदलत असल्याने बॅकलॉग विषयांबाबत समस्या उद्भवल्यास विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला संबंधित विद्यार्थ्यांची त्रुटी दूर करताना अनंत अडचणी येतात. परंतु, सहा सेमिस्टरपर्यंत आता एकच आसन क्रमांक राहणार असल्याने विद्यार्थी देखील आश्वस्त होणार आहे. एकंदरीत १० आकड्यांचे परीक्षा आसन क्रमांक असणार आहे. हाच क्रमांक सहा सेमिस्टरपर्यंत राहणार आहे. शाखानिहाय आसन क्रमांक देण्याची तयारी करण्यात आली आहे.
असे दिले जातील रोल नंबर
परीक्षांचे वर्ष लक्षात घेऊन त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना आसन क्रमांक दिला जाणार आहे. हिवाळी २०२१ या परीक्षांसाठी २१०००१००००१ अशी अनुक्रमे सुरूवात केली जाणार आहे. १० सेमिस्टरपर्यंत विविध अभ्यासक्रमांचे आसन क्रमांक दिले जाणार आहे. तथापि, सहा सेमिस्टरपर्यंत परीक्षेसाठी एकच आसन असणार आहे. आसनाचे पहिले दाेन डिजिट आकडे हे वर्षासाठीचे असतील. त्यानंतरचे तीन डिजिट कोर्स कोडचे असणार आहे. त्यानंतरचे पाच डिजिट शाखानिहाय असतील, अशी रचना करण्यात आली आहे.
कोणतीही परीक्षा, निकालानंतर विद्यार्थी वेगवेगळे प्रश्न, समस्या घेऊन येतात. मात्र, विद्यार्थ्यांचे वेगवेगळे आसन क्रमांक असल्याने त्यांचे मूळ प्रश्न सोडविताना अनेक अडचणी येतात. मात्र, आता १० अंकी आसन क्रमांकामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष, शाखा आणि अभ्यासक्रम क्षणात लक्षात येईल. त्यामुळे ही प्रणाली परीक्षा विभागासाठी सुकर ठरणार आहे.
- डॉ. हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ