‘स्टडी टूर’मध्ये सर्वाधिक अनियमितता!

By admin | Published: April 13, 2016 12:16 AM2016-04-13T00:16:06+5:302016-04-13T00:16:06+5:30

दारिद्र्यरेषेखालील महिलांना रोजगार व रोजगारातून स्वयंरोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा उदात्त हेतूलाच हरताळ फासण्यात आला.

Study at the highest irregularity! | ‘स्टडी टूर’मध्ये सर्वाधिक अनियमितता!

‘स्टडी टूर’मध्ये सर्वाधिक अनियमितता!

Next

अनाठायी खर्च : महिलांची मुंबईला ‘पंचतारांकित’ सहल
अमरावती : दारिद्र्यरेषेखालील महिलांना रोजगार व रोजगारातून स्वयंरोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा उदात्त हेतूलाच हरताळ फासण्यात आला. दारिद्र्यरेषेखालील महिलांच्या नावावर तत्कालीन अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पंचतारांकित सुविधा लाटल्या. मुंबईच्या या एकदिवसीय ‘स्टडी टूर’ मध्ये सर्वाधिक गौडबंगाल झाले. लेखापरीक्षणात ही अनियमितता उघड झाली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्यावेळी अजबच घडल्याचे आता समोर येऊ लागले आहे.
‘उद्योगलक्ष्मी पुणे’या नवख्या कंपनीला अमरावती महापालिकेच्या तिजोरीतून ३८ लाखांहून अधिकची रक्कम देण्यात आली. तत्पूर्वी २२० प्रशिक्षणार्थ्यांकरिता प्रति प्रशिक्षणार्थी १९ हजार याप्रमाणे ४१,८०,००० च्या अर्धी रक्कम २० लाख ९० हजार अग्रिम देण्यात आले.
उद्योगलक्ष्मी पुणेंनी चुकवला आयकर
प्रशिक्षणार्थ्यांच्या संख्येतील घोळ निस्तरला नसताना प्रत्येक प्रशिक्षणार्थींवर हजारोंचा खर्च दाखविण्यात आला. मात्र, प्रकल्प राबविण्यासाठी सन २०१४-१५ या वित्तीय वर्षातील खर्चाच्या माहितीचे विवरण नमूद करण्यात आले नाही. उद्योगलक्ष्मी पुणे यांच्या देयकामधून आयकराची रक्कम कपात करण्यात आली नाही. ते नियमबाह्य असून वसुलीस पात्र असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे.
दीड लाखांची अफरातफर
‘दी साल्वेशन आर्मी’ कुलाबा मुंबई येथील शिल्ड हाऊस सकाळी ६.३० ते ७.३० पर्यंत ९ तासांकरिता भाड्याने घेऊन दीड लाखांची रक्कम खर्ची टाकण्यात आली. ही सविस्तर माहिती देयकासोबत सादर करणे आवश्यक असताना खर्चाची पडताळणी न करता संशयास्पद देयके सादर करून निधी अपव्ययप्रकरणी चौकशीअंती जबाबदारी निश्चित करून संपूर्ण रक्कम संबंधितांकडूून वसूल होणे आवश्यक असल्याचे लेखापरीक्षकांचे मत आहे. प्रकल्प अधिकारीस्तरावरून प्रशिक्षणार्थ्यांची अधिकृत मंजूर यादी स्थायी समितीच्या ठरावासह मंजूर करणे आवश्यक असताना त्याप्रमाणे कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे सेंट्रल हॉल, रेडशिल्ड हाऊस कुलाबा मुंबई येथे किती प्रशिक्षणार्थ्यांची व्यवस्था केली गेली, ही माहिती नसल्याने नोंदविलेला. संपूर्ण खर्च संशयास्पद वाटतो, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

प्रशिक्षणार्थ्यांच्या
संख्येत घोळ
उद्योगलक्ष्मीच्या स्तरावरुन ताजमहाल पॅलेस मुंबई येथील जेवणाचे देयक अतिथी, प्रशिक्षणार्थी व प्रमुख पाहुणे, अधिकारी, कर्मचारी अशा एकूण २५० जणांचे दर्शविण्यात आले. मात्र, देयकांसोबत यादी जोडण्यात आली नाही. यापूर्वी विभागस्तरावरुन सादर केलेली प्रशिक्षणार्थ्यांची यादी व महापालिका अधिकारी-पदाधिकाऱ्यांची यादी १९९ इतकी होती. या यादीत पंच घोळ घालण्यात आला. त्यामुळे लेखापरीक्षकांनी ताजमहाल पॅलेस येथील १७८ प्रशिक्षणार्थी व मॅनेजमेंटचे १३ कर्मचारी अशा १९१ जणांची जेवणावरील खर्च अधिकृत ठरवला आहे.उर्वरित ५९ अधिकारी-पदाधिकारी कर्मचाऱ्यांवरील २,८७,०५१ रूपयांचा खर्च अमान्य ठरविण्यात आला आहे. येथे देयकासोबत यादी जोडण्यात आली नाही.

पावतीत गोंधळ
स्टडी टूरमध्ये सहभागी झालेल्यांना अतिशय महागड्या हॉटेलमध्ये भोजन देण्यात आले. मार्स एंटरप्रायजेस मुंबई यांच्यास्तरावरुन एक्झिक्युटिव्ह लंच आणि ब्रेकफास्टबाबत २,३७,६७६ रुपयांचे देयके सादर करण्यात आले. प्रत्यक्षात ३७,३७६ रुपये प्रदान करण्यात आले. परंतु उद्योगलक्ष्मी पुणे यांनी २,३७,६७६ रुपये प्राप्त झाल्याची पावती दिली. जादा रक्कम प्रदान करुन कमी रकमेची पावती कशी स्वीकृत करण्यात आली, याबाबत खुलासा घेण्यात यावा, अशी सूचना करीत जेवणावरील २,३७,६७६ रुपये खर्चाची रक्कम अमान्य करण्यात आली.
एकाच दिवशी तीन हॉल भाड्याने
उद्योगलक्ष्मी पुणे यांच्या स्तरावरुन कार्पोरेशन ते कार्पोरेट आंतरराष्ट्रीय बाजार स्टडीटूरसाठी एकाच दिवशी तीन ठिकाणी हॉल भाड्याने घेऊन २,९२,९३५ रुपये खर्च दाखविण्यात आला. मात्र, देयकासोबत कुठलीही माहिती जोडण्यात आली नाही. विभागाने त्याबाबत कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता सदोष व संशयास्पद देयके सादर केली. त्यामुळे संपूर्ण खर्चाची चौकशी करण्यात यावी आणि चौकशीअंती जबाबदारी निश्चित करुन संपूर्ण रक्कम संबंधितांकडून वसूल करण्याच्या सूचना लेखापरीक्षकांनी दिल्या आहेत.

Web Title: Study at the highest irregularity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.