१ ऑगस्टपासून अमरावती विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये अध्ययन होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 11:20 AM2020-06-05T11:20:31+5:302020-06-05T11:21:25+5:30
राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना विद्यापीठ, महाविद्यालयांत १ ऑगस्टपासून अध्ययन सुरू केले जाणार आहे. त्याअनुषंगाने उच्च शिक्षण विभागाने अकृषी विद्यापीठाचे कुलगुरुंच्या नावे पत्र पाठविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना विद्यापीठ, महाविद्यालयांत १ ऑगस्टपासून अध्ययन सुरू केले जाणार आहे. त्याअनुषंगाने उच्च शिक्षण विभागाने अकृषी विद्यापीठाचे कुलगुरुंच्या नावे पत्र पाठविले आहे.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’मध्ये विद्यापीठ, महाविद्यालये बंद आहेत. परीक्षा होणार की नाही, याबाबत एकमत झाले नाही. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मधील अभ्यासक्रम अध्ययनाबाबत उच्च शिक्षण विभागाने तयारी चालविली आहे. ४० टक्के ऑनलाइन आणि ६० टक्के ऑफलाइन अभ्यासक्रमावर भर दिला जाणार आहे. प्रथम वर्ष वगळता अन्य अभ्यासक्रम ऑगस्टपासून व प्रथम वर्ष अभ्यासक्रम १ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. कोरोनाची स्थिती सुधारेल अथवा नाही, याबाबत खात्री नाही. तथापि, विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये अध्ययन सुरू व्हावे, यासाठी उच्च शिक्षण विभाग सरसावला आहे. अध्ययनासाठी महाविद्यालयांना विद्यापीठाने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. यात तंत्रज्ञान प्लॅटफार्म निर्मिती, ऑनलाइन अभ्यासक्रम प्रभावीपणे पोहचविण्यासाठी अध्यापनशास्त्र मार्गदर्शक तत्त्वे, शैक्षणिक व्हिडीओ आकर्षित व रंजन करण्यासाठी लागणारे सहाय्य करणे, स्वयंम व तत्सम प्लॅटफॉर्मवरील शैक्षणिक साहित्यदेखील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाशी मॅप करून या संदर्भातील क्रेडिट मिळण्याच्यादृष्टीने कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहे. विद्यापीठ, महाविद्यालयांत अध्ययन संदर्भात कृती आराखडा तयार करून तो उच्च शिक्षण विभागाकडे ९ जून २०२० पर्यंत पाठवावा लागणार आहे.
उच्च शिक्षण विभागाने १ ऑगस्टपासून विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये अध्ययन सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. कुलगुरूंना कृती आराखडा तयार करून पाठवावा लागणार आहे. याबाबत विद्यापीठाला अवगत करण्यात आले आहे.
- केशव तुपे, सहसंचालक, उच्च शिक्षण अमरावती.