प्रजासत्ताक दिनी ‘स्टंट राईडर्स’चा धुमाकूळ
By admin | Published: January 28, 2017 12:17 AM2017-01-28T00:17:40+5:302017-01-28T00:17:40+5:30
प्रजासत्ताक दिनानिमित्त यावेळीही शहरात ‘स्टंट रायडर्स’ तरूणांचा धुमाकूळ पाहायला मिळाला.
अमरावती : प्रजासत्ताक दिनानिमित्त यावेळीही शहरात ‘स्टंट रायडर्स’ तरूणांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. पोलिसांच्या डोळ्यांदेखत दुचाकीवर जिवघेण्या कसरती करणारे तरूण, हाती तिरंगा घेऊन केली जाणारी जोरदार घोषणाबाजी व कर्णकर्कश्श हॉर्न वाजवून तरुणांनी अक्षरश: धिंगाणा केला. वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले. याप्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस विभागाने तब्बल २५० वाहनांवर कारवाईचा बडगा उगारत १० वाहने ‘डिटेन’ केली असून दीडशे दुचाकीस्वारांकडून तब्बल ५३ हजारांचा दंड वसूली केला.
अपघाताची शक्यता
अमरावती : प्रजासत्ताक दिनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही तरूणाईने विना परवाना दुचाकी रॅली काढल्या. प्रजासत्ताक दिनी सगळीकडे उत्साहाचे वातावरण असताना शहरातील विविध मार्गांवर दुचाकीस्वारांच्या टोळ्या ‘धूम स्टाईल’ भरधाव वाहने पिटाळताना दिसून आल्या. कर्कश्श हॉर्नमुळे कानठळ्या बसत होत्या. या स्थितीत अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि ध्वनीप्रदूषणाचा कहर झाला. या बेधुंद तरूणांना आवरताना पोेलिसांच्या नाकीनऊ आले होते. मात्र, पोलिसांनी तरूणाईचा हा धुमाकूळ कॅमेराबद्ध करून त्यांना ताब्यात घेतले. शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियमबाह्य वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी तब्बल २५० दुचाकीस्वारांवर कारवाई केली तर ट्रीपल सिट ४६ दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाई केली असून ‘रॅश ड्रायव्हिंग’करणाऱ्या १० दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या. (प्रतिनिधी)