काजळी येथील उपकेंद्र बनले शोभेची वस्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:13 AM2021-03-08T04:13:15+5:302021-03-08T04:13:15+5:30
आरोग्य विभागाचे दुर्लक्ष; ग्रामस्थांचा आरोप चांदूर बाजार : हवामानातील बदल आणि कोरोना विषाणूने सगळीकडे थैमान घातले आहे. यामुळे आरोग्याबाबत ...
आरोग्य विभागाचे दुर्लक्ष; ग्रामस्थांचा आरोप
चांदूर बाजार : हवामानातील बदल आणि कोरोना विषाणूने सगळीकडे थैमान घातले आहे. यामुळे आरोग्याबाबत प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. दवाखान्यांमध्ये गर्दी वाढली आहे. अशात काजळी येथे आरोग्य उपकेंद्रात सुविधांचा अभाव असल्याने ग्रामस्थांना खासगी दवाखान्यांकडून उपचार घ्यावे लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
आरोग्य तपासणीकरिता एकमेव ठिकाण असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर सुविधांचा अभाव असल्याने काजळी येथील आरोग्य केंद्र हे शोभेची वास्तू बनल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याशिवाय कुठल्याही नागरिकाने डॉक्टरांना विचारले असता, संबंधित आजाराविषयी औषधी उपलब्ध नसल्याचेच उत्तर मिळते. सदर औषधाचे आम्हाला ‘वरून’ वाटप झालेले नाही. त्यामुळे ते आपणास देऊ शकत नाही, अशी पुष्टी त्यासाठी जोडली जाते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यविषयी ग्रामीण आरोग्य यंत्रणा गंभीर नसल्याचे आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ज्या ठिकाणी नागरिकांच्या आजारासंदर्भात औषधी नसतील, तर अशा उपकेंद्राचा उपयोग काय, असा प्रश्न गावकºयांना पडला आहे.
काजळी येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये आरोग्यसेवक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आशा वर्कर अशी नेमणूक आहे. मात्र या आरोग्य केंद्रातील एक कर्मचारी हे सहा महिन्यांसाठी प्रशिक्षणावर गेले आहे. एक कर्मचारी चांदूर बाजार येथील रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर आहे, तर आरोग्यसेवक हे नियमित येत नसल्याने सर्व जबाबदारी ही आशा वर्कर यांच्यावर आली आहे.
-----