उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश कागदावरच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 10:46 PM2019-02-16T22:46:01+5:302019-02-16T22:46:40+5:30
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या प्रवेशबंदीच्या आदेशानंतरही भातकुली तालुक्यातील गावांमध्ये झालेली परप्रांतीय मेंढपाळांच्या घुसखोरीला ब्रेक लागलेला नाही. त्यामुळे महसूल विभाग आदेश काढून मोकळा झाला. मात्र, ज्यांच्यावर कारवाईची धुरा सोपविली, ती चार ते पाच ठाण्यांची पोलीस यंत्रणा अद्यापही गावांकडे फिरकली नसल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उपविभागीय अधिकाऱ्यांच्या प्रवेशबंदीच्या आदेशानंतरही भातकुली तालुक्यातील गावांमध्ये झालेली परप्रांतीय मेंढपाळांच्या घुसखोरीला ब्रेक लागलेला नाही. त्यामुळे महसूल विभाग आदेश काढून मोकळा झाला. मात्र, ज्यांच्यावर कारवाईची धुरा सोपविली, ती चार ते पाच ठाण्यांची पोलीस यंत्रणा अद्यापही गावांकडे फिरकली नसल्याचे चित्र आहे.
भातकुली तालुक्यातील ५० पेक्षा अधिक गावांमध्ये परजिल्ह्यांसह परप्रांतीय शेळया-मेंढ्या स्थानिकांची शेती व चारा फस्त करीत आहेत. तालुका आणि उपविभागीय अधिकाºयांच्या आदेशाला तिलांजली मिळाल्याने त्रस्त ग्रामस्थांनी स्वत: पुढाकार घेऊन शेळ्या-मेंढ्या पकडून कोंडवाड्यात टाकण्यास सुरुवात केली आहे.
शेतकºयांचे नुकसान व रक्तरंजित संघर्ष टाळण्यासाठी काठेवाडींकडील चराईसाठी येणाºया जनावरांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी विनोद शिरभाते यांनी २९ जानेवारी रोजी आदेश काढले. ही प्रवेशबंदी १५ मार्चपर्यंत अस्तित्वात राहील. तथापि, ते आदेश अद्यापही कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. भातकुली तालुक्यातील सायत, निंभा, हरताळा, भातकुली, गणोरी, गणोजा, गोपगव्हाण, हातुर्णा, सातुर्णा, अळणगाव, कुंड व लगतच्या अन्य गावांत जिल्ह्याबाहेरून लाखावर शेळ्या- मेंढ्या चराईसाठी आल्या आहेत. आधीच दुष्काळ असताना बाहेरील मेंढ्यांनी जंगल फस्त करणे सुरू केले आहे. त्या शेळ्या- मेंढ्या नव्याने केलेल्या वृक्षारोपणावर ताव मारत असल्याने ही घुसखोरी थांबवावी, अशी विनंती सायतचे सरपंच अनिल वर्धे यांनी तहसील व पोलीस प्रशासनाकडे केली. त्यांच्या पत्राची दखल घेत तिवसा-भातकुलीच्या एसडीओंनी प्रवेशबंदी केली. मात्र, १^^६ फेब्रु्रवारी रोजीसुद्धा सायत, अळणगाव, खारतळेगाव, खोलापूर, विर्शी, गोपगव्हाण, वासेवाडीलगत गावांत परप्रांतीयांच्या हजारो शेळ्या-मेंढ्या धुडगूस घालीत आहेत. आता पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
सरपंच अनिल वर्धे यांनी शनिवारी सायतमधील काठेवाडींच्या शेळ्या-मेंढ्या गावाबाहेर हाकलत त्यांना कोंडवाड्यात बंदिस्त केले.
पोलिसांकडून हवी कारवाई
बाहेरील सर्व जनावरांना भातकुली तालुक्यात प्रवेशबंदी घातल्याची माहिती भातकुलीसह वलगाव, खोलापूर, बडनेरा, आसेगाव पूर्णा व लोणी पोलिसांना देण्यात आली आहे. भातकुली तालुक्यातील गावे या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. प्रवेशबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीची जबाबदारी या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. प्रत्यक्षात पोलिसांकडून फारशी कारवाई होत नसल्याने आणि ग्रामस्थ त्या मेंढ्या गावातून हद्द पार करू लागल्याने नवा वाद पेटण्याची भीती निर्माण झाली आहे.
भातकुली तालुक्यातील ज्या गावांमधून तक्रारी प्राप्त झाल्यात, त्या गावात शिरलेल्या मेंढपाळांच्या मुखियांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. नोटीस बजावण्यात आल्या. अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आलेत.
- पंकज दाभाडे
प्रभारी ठाणेदार, भातकुली
स्थानिक आणि परप्रांतीय मेंढपाळांतील संघर्ष टाळण्यासाठीच बाहेरील व काठेवाडी गुराढोरांना तालुक्यात प्रवेशबंदी घातली आहे. कारवाई व अंमलबजावणीसाठी आदेशाच्या प्रती संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना पाठविल्यात.
- विनोद शिरभाते, एसडीओ