पोलीस उपनिरीक्षक पाच हजार रूपयांची लाच घेताना जेरबंद
By admin | Published: May 27, 2014 11:20 PM2014-05-27T23:20:28+5:302014-05-27T23:20:28+5:30
चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पाच हजारांची लाच स्वीकारताना चांदूरबाजारचे पोलीस उपनिरीक्षक भागवत बिदसिंग पाटील यांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक
चांदूरबाजार : चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पाच हजारांची लाच स्वीकारताना चांदूरबाजारचे पोलीस उपनिरीक्षक भागवत बिदसिंग पाटील यांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहात पकडले. ही घटना मंगळवारी दुपारी ३.४५ वाजता स्थानिक पंचायत समिती चौकात घडली. या प्रकरणात भागवत पाटील यांना ताब्यात घेऊन त्यांचेविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. विठ्ठल गुलाबराव कुचे व विजय महादेवराव घुरुले यांची घरे एकमेकांच्या शेजारीच आहेत. विजय घुरुले हे मुळचे नागपूरचे रहिवासी असून वीज वितरण कंपनीत ते चांदूरबाजार येथे कार्यरत आहेत. विठ्ठल कुचे यांनी विजय घुरुले यांच्याविरूद्ध चांदूरबाजार पोलिसात ३0 हजार रूपये चोरून नेल्याची तक्रार ६ एप्रिल २0१४ रोजी केली होती. हे प्रकरण चौकशीत ठेवून तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत पाटील यांच्याकडे होता. याप्रकरणात भागवत पाटील यांनी पाच हजार रूपयाची मागणी करुन मागणी पूर्ण न झाल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी विजय घुरुले यांना दिली होती. यासंदर्भाची तक्रार विजय घुरुले यांनी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार मंगळवारी दुपारी अमरावती विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात विभागीय पोलीस अधिकारी (लाचलुचपत) उत्तम जाधव यांनी आपल्या सहकार्यांसह पंचायत समिती परिसरात सापळा रचला. यात पोलीस उपनिरीक्षक भागवत पाटील हे पाच हजारांची लाच घेताना अडकले. या प्रकरणात विठ्ठल कुचे यांनी विजय घुरुले यांना १५ हजार रूपये व्याजाने दिले होते. ते वसूल करण्यासाठी कुचे यांनी घुरुले यांच्याविरुद्ध चोरीच्या तक्रारीचे अस्त्र वापरण्याची बाब समोर आल्याचे उपअधीक्षक उत्तम जाधव यांनी सांगितले. या कारवाईत भागवत पाटील यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)