सात महिन्यांसाठी चांदूरबाजार तालुक्याला उपविभागाचा दर्जा
By Admin | Published: March 25, 2015 12:15 AM2015-03-25T00:15:03+5:302015-03-25T00:15:03+5:30
१ मार्चपासून चांदूरबाजार तालुक्याला उपविभागाचा दर्जा प्राप्त झाला असला तरी हा दर्जा केवळ सात महिन्यासाठी आहे. १ जून २०१४ पासून येथे तहसीलदार म्हणून...
चांदूरबाजार : १ मार्चपासून चांदूरबाजार तालुक्याला उपविभागाचा दर्जा प्राप्त झाला असला तरी हा दर्जा केवळ सात महिन्यासाठी आहे. १ जून २०१४ पासून येथे तहसीलदार म्हणून डॉ. शरद जावडे (परिवेक्षाधिन उपजिल्हाधिकारी) थेट नियुक्ती झाली होती. त्याचा हा कार्यकाळ २८ फेब्रुवारी २०१५ रोजी संपल्यामुळे त्यांची इतरत्र स्थानांतरण न करता महसूल विभागाने स्थानिक तहसीलमध्येच उपविभागीय अधिकारी म्हणून १ मार्चपासून पुढील सात महिन्यासाठी नियुक्ती केल्याने चांदूरबाजारला उपविभागाचा दर्जा प्राप्त झाला असून या तहसीलमधून अचलपूर उपविभागीय कार्यालयात यापूर्वी केली जात असलेली सर्व कामे आता याच ठिकाणी होऊ लागल्यामुळे लाभार्थ्यांची मोठी सोय झाली आहे.
या काळात या तालुक्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या वाटप केलेल्या अनुदान वाटपात जिल्ह्यात विक्रम केला असून या तालुक्यातील ४० हजार २७३ शेतकऱ्यांपैकी ३९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांची रक्कम जमा करून ९८.३४ टक्केवारी गाठली आहे. या निधी वाटपाचे नियोजनाचे सुत्र स्वत: जावडे यांनी हाताळून यास सर्वांचे सहकार्य घेतले. अनुदानाची २५ कोटी ५५ लाख ४८ हजार रकमेतून २५ कोटी १३ लाख २७ हजार ५४८ एवढ्या रकमेचे वितरण करण्यात आले आहे. १२७३ शेतकऱ्यांचे ४३ लक्ष रूपयाचे शिल्लक असलेले अनुदान खाते नंबराच्या चुकीमुळे शिल्लक असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सात महिने का होईना येथे उपविभागात केली जाणारी जात प्रमाणपत्र वितरण, अपील, सिलींगची प्रकरण, झाडे तोडण्याची परवानगी, नॉन क्रिमीलियर तसेच कायदा व सुव्यवस्था प्रकरणे याच ठिकाणी हाताळली जातात. यापूर्वी अचलपूरला जावे लागत होते. (तालुका प्रतिनिधी)