महाविद्यालयीन शैक्षणिक शुल्काचा विषय आता विद्वत परिषदेच्या कोर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:10 AM2021-06-21T04:10:29+5:302021-06-21T04:10:29+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे विविध शुल्क कमी करण्याचा निर्णय आता विद्वत ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे विविध शुल्क कमी करण्याचा निर्णय आता विद्वत परिषदेच्या कोर्टात असणार आहे. विद्यार्थी संघटनांच्या मागणीच्या अनुषंगाने विद्यापीठाने यासाठी पुढाकार घेतला आहे.
अभाविप, एनएसयूआय, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, एआयएसएफ आदी विद्यार्थी संघटनांनी कोरोनाकाळात महाविद्यालये बंद असताना क्रीडांगण, प्रयोगशाळा, शैक्षणिक शुल्क आकारण्याबाबत आक्षेप घेतला. विद्यार्थ्यांना अनावश्यक शुल्क आकारू नये, यासाठी कुलगुरूंना निवेदन सादर करण्यात आले. त्याअनुषंगाने विद्यापीठाने प्राचार्यांची ऑनलाईन बैठक आयोजित करून या शुल्काबाबत मते जाणून घेतली. मात्र, धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार हे विद्वत परिषदेला असल्याने आता हा विषय ऑनलाईन बैठकीत चर्चा होऊन विद्यार्थी संघटनांच्या मागणीवर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती परीक्षा व मू्ल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली.
---------
कोट
महाविद्यालयीन शैक्षणिक, प्रवेश शुल्काबाबत कुलगुरूंशी चर्चा झाली आहे. सूचनादेखील पत्राद्वारे पाठविण्यात आल्या आहेत. गरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काबाबत शासनाने तोडगा काढावा.
- आर.डी. सिकची, अध्यक्ष, प्राचार्य फोरम.
--------------
कोट
शैक्षणिक शुल्काबाबत विद्यापीठाने मते जाणून घेतली. धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार प्राचार्यांना नाहीत. त्यामुळे याविषयी विद्वत परिषदेत चर्चा होऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे संकेत आहे.
- दीपक धोटे, प्राचार्य, ब्रजलाल बियाणी महाविद्यालय.