गटशेतीचे प्रस्ताव सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 10:40 PM2018-02-10T22:40:06+5:302018-02-10T22:41:45+5:30
गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गटशेतीस चालना देण्याच्या योजनेंतर्गत प्रत्येक तालुका कृषी अधिकाऱ्यांनी गटशेतीचे प्रस्ताव (डीपीआर) तातडीने जिल्हा प्रशासनास सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिले.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गटशेतीस चालना देण्याच्या योजनेंतर्गत प्रत्येक तालुका कृषी अधिकाऱ्यांनी गटशेतीचे प्रस्ताव (डीपीआर) तातडीने जिल्हा प्रशासनास सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बांगर बोलत होते. यावेळी जि.प. सदस्य, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, उपजिल्हाधिकारी काळे, तालुका कृषी अधिकारी, गटांचे सदस्य उपस्थित होते. पुढे बोलताना बांगर म्हणाले, गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गटशेतीस चालना देणे ही मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात पाच ते सहा शेतकरी गट, उत्पादक कंपनी स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातून १५ प्रतिनिधी गट, उत्पादक कंपनी यांच्याद्वारा प्रस्ताव सादर करण्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत कृषी आयुक्तांना बैठकीत दिली होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होण्याच्या दृष्टीने तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यातील कृषिक्षेत्राशी निगडित उत्कृष्ट गटांची निवड करून त्यांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनास सादर करावे अशा सूचना त्यांनी दिली. एका समूहातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शिवारातील संलग्न भौगोलिक क्षेत्रामध्ये सामूहिक नियोजनबद्ध शेती करणे, कृषिउत्पादनावर प्रक्रिया व मूल्यवर्धन करणे, एकत्रित विपणन करणे यासाठी सामूहिक स्वरूपाची व्यवस्था निर्माण करणे, शेती या व्यावसायिक जीवनपद्धतीद्वारा स्वत:ची, गटाची, समूहाची उन्नती व विकास घडवून आणण्याची प्रक्रिया व रचना म्हणजे गटशेती होय, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. गटशेती योजनेचा मुख्य उद्देश हा गटांना बळकटीकरण करणे हा आहे. सदर योजनेत सामूहिक लाभ ७५ टक्के व वैयक्तिक लाभ २५ टक्के दिला जाणार आहे. यासाठी गटामध्ये संघटन असणे महत्त्वाचे आहे. गटशेतीचे प्रस्ताव मंजूर झाल्यावर बँकेकडून वित्तपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासन सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गटशेतीच्या माध्यमातून हळद, ओवा, जिरे लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. यावर्षी हळदीचे उत्पादन चांगले झाल्याने भाव मिळवून देण्यासाठी प्रशासन सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला कृषी अधिकारी उपस्थित होते.