कृषि निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना चार हजारांपर्यंत अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:13 AM2021-05-20T04:13:31+5:302021-05-20T04:13:31+5:30
अमरावती : खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे, पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनी किट यासाठी महाडीबीटी पोर्टलवर २० मेपर्यंत अर्ज ...
अमरावती : खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे, पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनी किट यासाठी महाडीबीटी पोर्टलवर २० मेपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. यात शेतकऱ्यांना एक एकराच्या मर्यादेत दोन ते चार हजारांपर्यंत अनुदान डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिली.
पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सूक्ष्म मुलद्रव्ये भूसुधारके व पीक संरक्षण औषधी या निविष्ठांसाठी एक एकराच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधित पिकांच्या प्रकारानुसार दोन ते चार हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहेत. यासाठी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत आहेत. या पॅकेजचा वापर करणे अनिवार्य असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कापूस व मका पिकांमध्ये मिनी किट कडधान्यांचे आंतरपीक घेणे अनिवार्य आहे. यात अमरावती जिल्ह्याकरिता तूर व मूगाचा आंतरपिकाकरिता समावेश करण्यात आलेला आहे. तूर व मूग यापैकी एका पिकाचे चार किलोचे एक बियाणे मिनी किट देण्यात येणार आहे. यात तूर चार किलो ४१२ रुपये, मूग चार किलो ४०७ रुपये याप्रमाणे अनुदान देय असणार आहे. मिनी किटची किंमत अनुदानापेक्षा अधिक असल्यास जास्तीची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे.
बॉक्स
असे होणार बियाण्यांचे वितरण
कडधान्य बियाण्यांसाठी १० वर्षांआतील वाणाला ५० रुपये प्रतिकिलो, १० वर्षांवरील वाणाला २५ रुपये प्रतिकिलो ज्वारी व बाजरी सरळ वाणाच्या बियाण्यांकरिता ३० रुपये प्रतिकिलो, १० वर्षांआतील वाणाला ३० रुपये प्रतिकिलो, १० वर्षांवरील वाणाला १५ रुपये प्रतिकिलो, सोयाबीन बियाण्यांसाठी १० ते १५ वर्षांचे वाणासाठी १२ रुपये प्रतिकिलो एकूण किमतीच्या एकूण किमतीच्या ५० टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाण्यांसाठी एका शेतकऱ्याला दोन हेक्टर मर्यादेत लाभ देय राहील.