सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे अनुदान बायोमेट्रिक पद्धतीने

By admin | Published: March 26, 2016 12:14 AM2016-03-26T00:14:25+5:302016-03-26T00:14:25+5:30

तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेंतर्गत येणाऱ्या सर्व सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे अनुदान आता लाभार्थ्यांना थेट गावातच मिळणार आहे.

Subsidy of Social Assistance Schemes By Biometric Method | सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे अनुदान बायोमेट्रिक पद्धतीने

सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे अनुदान बायोमेट्रिक पद्धतीने

Next

पायपीट थांबणार : अचलपूर, चांदूरबाजारात प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प
चांदूरबाजार : तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेंतर्गत येणाऱ्या सर्व सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे अनुदान आता लाभार्थ्यांना थेट गावातच मिळणार आहे. परिणामी या योजनांमधील वृद्ध, अपंग व महिला लाभार्थ्यांची अनुदानासाठी होणारी पायपीट थांबणार आहे. त्यासाठी तालुक्यात बायोमेट्रीक प्रकल्प राबविण्यात येणार असून या प्रकल्पाचे काम युद्धस्तरावर सुरू आहे.
सामाजिक अर्थसहाय्य योजनेद्वारे तालुक्यात आजमितीस श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, संजय गांधी अर्थसहाय्य व अपंगांना लाभ दिला जातो. सद्यस्थितीत तालुक्यातील २८ हजार ५३५ लाभार्थ्यांना हा लाभ मिळत आहे. यासर्व लाभार्थ्यांना दर महिन्याला अनुदानप्राप्तीसाठी नेमून दिलेल्या बँकांपर्यंत पायपीट करावी लागते. बरेचदा अनुदान खात्यात जमा होण्यास विलंब होतो. त्यामुळे सर्वच लाभार्थ्यांना बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे लाभार्थ्यांचा वेळ व प्रवासाचा खर्च व्यर्थ जातो. यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना खात्यात जमा झालेले अनुदान काढण्यासाठी कुणाची तरी मदत घ्यावी लागते. अशा मदतनिसांना ‘एजंट’ म्हटले जाते. हा एजंट खात्यात अनुदान जमा झाले की त्याच्या परिचयातील दहा ते बारा लाभार्थ्यांना बँकेमध्ये सोबत घेऊन येतो. त्यांना बँक खात्यातील अनुदान काढून देण्यास मदत करतो. त्या मोबदल्यात हा एजंट लाभार्थ्यांकडून प्रत्येकी १०० रुपये घेतो.
आता बायोमेट्रिक प्रकल्पामुळे लाभार्थ्यांना गावांतच अनुदान मिळणार असल्यामुळे एजंटाद्वारे त्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबणार आहे. तसेच बोगस लाभार्थ्यांची संख्याही बायोमेट्रीकमुळे उघडकीस येणार असल्याने शासनाचे आर्थिक नुकसान थांबविण्यासही मदत मिळणार आहे.
हा बायोमेट्रिक प्रकल्प तालुक्यात आयसीआयसीआय बँक व फिनोपेटेक लिमिटेड कंपनी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जाणार आहे. प्रकल्पावर बँकेतर्फे ज्ञानेश्वर लिंबतुरे व कंपनीकडून राज्य प्रमुख दिग्विजय देशमुख काम पाहात आहेत. लाभार्थ्यांना गावांतच अनुदान प्राप्त होण्यासाठी आयसीआयसीआय बँकेमार्फत खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती संगणकावर नोंदवून घेण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी लाभार्थ्याचे आधारकार्ड आवश्यक आहे. तसेच कंपनीकडून लाभार्थ्यांची गावनिहाय आकडेवारी घेणे सुरू असून एक हजार लाभार्थ्यांसाठी एक पॅनल तयार केले जाईल.
या माध्यमातून गावातील ग्रामपंचायत कार्यालयात आधारकार्ड व बायोमेट्रीकवर अंगठा ठेऊन लाभार्थ्याची ओळख पटल्यानंतर त्याला अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी तालुक्यात २५ ते ३० पॅनल तयार करण्यात येणार आहेत. या आधी हा प्रकल्प नाशिक जिल्ह्यात राबविण्यात आला आहे. त्याठिकाणी चांगले परिणाम दिसून आल्यानंतर अमरावती जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर चांदूरबाजार व अचलपूर तालुक्याची हा प्रकल्प राबविण्यासाठी निवड करण्यात आली आहे. प्रकल्प त्वरीत कार्यान्वित होण्यासाठी लाभार्थ्यांनी आधारकार्डसह संपूर्ण माहिती तहसील कार्यालयात देणे आवश्यक आहे.या प्रकल्पामुळे निराधार योजनांच्या लाभासाठी लाभार्थ्यांची होणारी वणवण थांबण्यास मदत होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Subsidy of Social Assistance Schemes By Biometric Method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.