मंदिरांच्या जीर्णोद्धारांसाठी बच्चू कडू यांचा यशस्वी पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 11:21 AM2024-11-06T11:21:13+5:302024-11-06T11:22:15+5:30
Amravati : कोट्यवधी रुपयांच्या निधीने मंदिरांना झळाळी, दिव्यांग, गोरगरीब, शेतकरी, निराधारांसाठी लढा
लोकमत न्यूज नेटवर्क
अचलपूर : कडू हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अजब रसायन आहे. सत्य बोलायला न घाबरणाऱ्या बच्चू कडू यांनी धर्मातील चुकीच्या गोष्टीचे कदापि समर्थन केले नाही. मात्र धर्मासाठी आणि धर्माच्या विस्तारासाठी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपले कार्य सदैव सुरू ठेवले.
विरोधकांनी नेहमी त्यांना धर्माच्या मुद्द्यांवरून घेरण्याच्या प्रयत्न केला. पण बच्चू कडू यांनी अचलपूर मतदारसंघातील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून या दिवाळीला मतदारसंघातील मंदिरांना झळाळी मिळाली, हे विशेष. देव, देश आणि धर्म यासाठी विरोधक केवळ गोष्टी करतात. मात्र देशाचा नागरिक म्हणून धर्माचा रक्षक समजून बच्चू कडू यांनी देवांची मंदिरे उजळवून टाकली.
त्यांच्या कामाची पद्धत ही वेगळी असून त्यांचा लढा खऱ्या अर्थाने दिव्यांग, गोरगरीब, निराधार, शेतकरी बांधव यांच्यासाठी असून त्यांच्या आशीर्वादाने आपण निवडून आलो, असे ते जाहीरपणे सांगतात. अचलपूर मतदारसंघातील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी शासनाकडून वेगवेगळ्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून मंदिरांचा कायापालट करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले
जयस्तंभ चौकातील शिवतीर्थचा होणार कायापालट
परतवाडा येथील जयस्तंभ चौक येथे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. परतवाडा येथील शिवप्रेमींचे ते शिवतीर्थ आहे. शिवतीर्थच्या विकासाकरिता आमदार बच्चू कडू यांनी आपल्या निधीतून तब्बल ६० लक्ष रुपये मंजूर करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या परिसरातील सौंदर्यार्थीकरण करण्यात येणार आहे. यामुळे परतवाड्याच्या लौकिकात भर पडणार एवढे मात्र नक्की.
अचलपुरातील २२ प्राचीन मंदिरांचे रूपडे पालटले
अचलपूर विधानसभेत अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्या प्रत्येक मंदिराला इतिहास आहे. जवळपास १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून जीर्णोद्धार करण्याचे काम बच्चू कडू यांनी केले आहे. मोठ्या प्रमाणात मंदिरांसाठी निधी उपलब्ध करून अचलपुरातील सर्व भाविक भक्तांची मने त्यांनी जिंकली आहेत. अष्टमासिद्धी येथील प्रसिद्ध कापूर विहिरीच्या विकासाला तब्बल पाच कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. अचलपूर येथील बारी समाज हनुमान व्यायाम आखाडा या कामाकरता २ कोटी २२ लक्ष रुपये मंजूर करून दिले आहेत. त्यासोबतच जवळपास अचलपुरातील २२ प्राचीन मंदिरांकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन तेथील खऱ्या अर्थाने विकास केला आहे.