शेतमजूर पुत्राचा यशस्वी प्रवास!
By admin | Published: April 9, 2016 12:01 AM2016-04-09T00:01:50+5:302016-04-09T00:01:50+5:30
जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याची क्षमता असेल तर काहीही अशक्य नाही. येथील एका शेजमजुराच्या मुलाने चक्क शिपाईपदापासून वित्त व लेखाधिकारी पदापर्यंतचा...
जिद्दीला सलाम : शिपाई ते वित्त व लेखाधिकारी
दर्यापूर : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याची क्षमता असेल तर काहीही अशक्य नाही. येथील एका शेजमजुराच्या मुलाने चक्क शिपाईपदापासून वित्त व लेखाधिकारी पदापर्यंतचा नेत्रदीपक प्रवास करून इतरांपुढे आदर्श घालून दिला आहे.
चंद्रकांत साहेबराव खारोडे असे या शेतकरीपुत्राचे नाव आहे. त्याने अलीकडेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची वित्त व लेखाधिकारी वर्ग -१ पदी निवड झाली. गजानन कोरे यांच्याकडून स्पर्धा परीक्षेचे धडे घेऊन त्याने तीन वर्र्षांत यश संपादन केले. तीन वर्षांपूर्वी चंद्रकांत हा कृषी अधिकारी कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत होता. येथील भवानीवेश परिसरात चंद्रमौळी झोपडी आहे. शिपाईपदावर कार्यरत असताना अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यादिशेने त्याचे प्रयत्न सुरू होते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून त्याने विक्रीकर निरीक्षकाची परीक्षा दिली. ही परीक्षा त्याने उत्तीर्ण केली. त्यातून त्याची नागपूर येथे विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाली. हे करीत असताना पुन्हा त्याने ‘एमपीएससी’ची परीक्षा देऊन नेत्रदीपक यश संपादन केले आहे. आयएएस अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न असल्याचे त्याने सांगितले. दर्यापूर तालुक्यातील शुभम ठाकरे व सतीश गावंडे यांची वर्ग -२ च्या अधिकारीपदी निवड झाली आहे.