आतड्यांवरील गुंतागुंतीच्या दोन शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:13 AM2021-03-28T04:13:12+5:302021-03-28T04:13:12+5:30
अमरावती : सेंट्रिगचे काम करताना अपघात होऊन एका युवकाच्या पोटात आरी घुसल्याने त्याची आतडी बाहेर पडली. गंभीर अवस्थेत ...
अमरावती : सेंट्रिगचे काम करताना अपघात होऊन एका युवकाच्या पोटात आरी घुसल्याने त्याची आतडी बाहेर पडली. गंभीर अवस्थेत त्याला इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाच्या पथकाने तात्काळ त्याच्यावर उपचार सुरू केला. शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे युवकाला जीवदान मिळाले.
जिल्हा रुग्णालयातील सर्जन संतोष राऊत यांच्या पथकाने आतड्यांवरील गुंतागुंतीच्या दोन शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केल्याने हे दोन्ही रुग्ण सुखरूप आहेत. मोर्शीच्या रामजीनगरातील रहिवासी अजय भलावी हा साधारणत: २५ वर्षीय युवक १९ मार्च रोजी सेंट्रिगचे काम करीत होता. त्यावेळी आरी चालवत असताना अचानक त्याच्या डोळ्यात कचरा गेला व तत्क्षण अपघाताने आरी त्याच्या पोटात घुसून त्याची आतडी बाहेर पडली. त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. वॉर्ड क्र. १६ येथील शल्यचिकित्सालयात दाखल होताच तेथील तज्ज्ञ संतोष राऊत यांनी स्थिती लक्षात घेऊन तात्काळ शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला व यशस्वीपणे ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. अजयच्या प्रकृतीत सध्या सुधारणा होत असल्याची माहिती डॉ. राऊत यांनी दिली.
बॉक्स
पुण्यातील दवाखान्यात पैसे गेले; इलाज इर्विनमध्ये झाला
पंकज कदम हे अकोला जिल्ह्यातील रहिवासी असून, ते पुण्यात राहतात. त्यांच्या लिव्हरवर सूज आल्याने पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक लाखांवर खर्च झाला. मात्र, उपयोग झाला नाही. पंकज यांना २० मार्चला इर्विनमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या पोटातील आतडी फाटलेली व जठराला नुकसान पोहचल्याचे डॉ. राऊत यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार शस्त्रक्रिया त्यांनी केली.
बॉक्स
अन्य जिल्ह्यातूनही उपचारार्थ रुग्ण, सीएस
जिल्हा सामान्य रुग्णालयात ४०० खाटांपैकी सर्जिकल सेवेच्या १३० खाटा आहेत. दिवसाला तीन ते चार ऑपरेशन होतात. बरेचदा अकोल्याहूनही रुग्ण येथे हलविले जातात. दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी, तसेच महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना व इतर योजनांचा लाभ दिला जातो. थॅलेसिमिया, सिकलसेल आदी रक्तांशी संबंधित आजारांवरही उपचार उपलब्ध असल्याचे सीएस श्यामसुंदर निकम यांनी सांगितले.