लॉकडाऊनवर असाही तोडगा! जनावरांचा बाजार आता सोशल मीडियावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 10:23 AM2021-05-21T10:23:50+5:302021-05-21T10:24:20+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आठवडी बाजार बंदच आहेत. त्यामुळे शेतकरी आता गुरांची खरेदी-विक्री सोशल मीडियाच्या माध्यमातून करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आठवडी बाजार बंदच आहेत. त्यामुळे शेतकरी आता गुरांची खरेदी-विक्री सोशल मीडियाच्या माध्यमातून करीत आहेत. सोशल मीडियावर आपल्या जनावरांचे फोटो टाकून त्याखाली आपला मोबाइल क्रमांक दिला जातो. ज्या शेतकऱ्यांना जनावरांची खरेदी करायची आहे, त्यांनी मोबाईलवर संपर्क करण्याचे आवाहन केले जाते. त्यामुळे सोशल मीडियावरही आता गुरांची खरेदी-विक्री होताना दिसत आहे.
खरीप हंगाम महिनाभरावर आल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे गुरांचा बाजार बंद आहे. त्यामुळे बैलांची खरेदी- विक्री बंद झालेली आहे. परिणामी वर्षभरात एक कोटीची होणारी उलाढाल ठप्प झाल्याने बैलांद्वारे केली जाणारी शेती मशागतीची कामे अडचणीत सापडली आहेत. हवामान खात्याने यंदा मान्सून हा जूनच्या १ तारखेला धडकणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आसेगावासह परिसरातील शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामांना वेग दिला आहे. सद्यस्थितीत शिवारात ट्रॅक्टरद्वारे नांगरणीच्या कामांना वेग आला आहे. वाढत्या महागाईमुळे शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यावर भर देत असल्याचे दिसून येते. शेतकरी बैलांच्या साह्याने यंदा मशागतीची कामे करण्यास प्राधान्य देत आहे. एप्रिल व मे महिन्यांत बैलजोडी खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असताना मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैलबाजार बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. काही शेतकरी वैयक्तिक स्तरावर बैलांचा शोध घेत आहेत. अशातच बैलांचे भावदेखील प्रचंड वाढले आहेत.
दोन-तीन वर्षांपासून नापिकी होत असल्यामुळे चाराटंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे दूध व्यवसायाची जनावरे विक्री केल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय उरलेला नाही. विक्री व खरेदी करण्याकरिता बैलबाजार पेरणीच्या तोंडावर खुला करण्यात यावा.
- राजेंद्र नवले, शेतकरी, हिवरा पूर्णा
दोन-तीन एकर शेती असणाऱ्यांना यंत्राच्या साह्याने शेती करणे परवडत नाही. त्यामुळे बैलजोडीशिवाय लहान शेतकऱ्यांना पर्याय नाही. मात्र, लॉकडाऊनमुळे बैलबाजार बंद असल्याने बैलजोडी खरेदी-विक्री करण्याकरिता पेच निर्माण होत आहे.
- योगेश कोळस्कर, शेतकरी, आसेगाव पूर्णा