सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अचानक सुटली गोळी, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 01:14 AM2019-06-01T01:14:26+5:302019-06-01T01:16:33+5:30
श्याम चौकातील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या आत गस्त घालत असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने बँकेतील कंत्राटी सफाई कर्मचारी गंभीर जखमी झाला. त्यांच्या उजव्या जांघेत गोळी लागल्याने बँकेत एकच खळबळ उडाली. ही घटना शुक्रवारी दुपारी ४.१५ वाजता दरम्यान घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : श्याम चौकातील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या आत गस्त घालत असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने बँकेतील कंत्राटी सफाई कर्मचारी गंभीर जखमी झाला. त्यांच्या उजव्या जांघेत गोळी लागल्याने बँकेत एकच खळबळ उडाली. ही घटना शुक्रवारी दुपारी ४.१५ वाजता दरम्यान घडली.
उज्ज्वल साहेबराव देशमुख (५२, रा. सातुर्णा, अमरावती) असे जखमीचे नाव आहे. शरद विठ्ठलराव महल्ले (५५, रा. सुसंयोग कॉलनी, कठोरा नाका) असे गोळी झाडणाऱ्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. घटना घडताच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी जखमीला झेनिथ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. बँकेत सुरक्षा रक्षकाच्या हातातील बंदुकीतून अचानक गोळी सुटली आणि ती लागल्याने बँकेतील कऊंटर क्रमांक ११ व १२ च्या मागे उभे असलेले सफाई कर्मचारी उज्ज्वल देशमुख खाली कोसळले. त्यांच्या उजव्या जांघेतून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. त्याकारणाने बँकेत खळबळ उडाली. यावेळी बँकेत ५० पेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी व अनेक ग्राहक उपस्थित होते.
रक्ताच्या थारोळ््यात पडलेल्या उज्ज्वल देशमुख यांना येथील अधिकारी-कर्मचाºयांनी तातडीने बँकेच्या वाहनातून उपचारासाठी खत्री कॉम्पलेक्सनजीक असलेल्या झेनिथ हॉस्पिटलमध्ये नेले. घटनेची माहिती सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सिटी कोतवालीचे ठाणेदार शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल उमाकांत असोलकर, सुहास शेंडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
दरम्यान, उज्ज्वल देशमुख यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. त्यांच्यावर शनिवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. या घटनेमुळे रुग्णालय परिसरातदेखील बघ्यांची गर्दी होती.
१२ बोर पंप अॅक्शन गनमधून सुटली गोळी
बँकेत दोन सुरक्षा रक्षक तैनात होते. यापैकी शरद महल्ले यांच्या बंदुकीतून गोळी सुटल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले. शरद महल्ले हे माजी सैनिक असून, त्यांनी १७ वर्षे मराठा रेजिमेंटमध्ये देशाची सेवा केली आहे. तेथून निवृत्त झाल्यानंतर ते २००१ पासून स्टेट बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याजवळ असलेल्या १२ बोर पंप अॅक्शन गनमधून गोळी सुटली आणि येथील सफाई कर्मचाºयाला लागली.
अधिकाºयांसह, नागरिकही घाबरले
४.३० वाजता बँकेची दारे बंद होतात. त्याच्या पंधरा मिनिटांपूर्वीच बंदुकीतून अचानक गोळी सुटली. ही घटना घडताच येथे कार्यरत अधिकारी, कर्मचारी व नागरिकही बंदुकीच्या आवाजाने घाबरले. काही वेळ नेमके काय झाले, हे कुणालाच कळले नाही. यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले उज्वल देशमुख यांच्या दिशेने सर्वांनी धाव घेतली. काऊंटर क्रमांक १२ वर बँकेच्या सिनिअर असोसिएट संगीता कोल्हे व काऊंटर क्रमांक ११ वर ज्युनिअर असोसिएट प्रतीश अढावू काम करीत होते. अगदी त्यांच्या मागेच ही घटना घडल्याने तेसुद्धा भयभीत झाले होते. तातडीने जखमींना उचलण्यात आले.
मी माझ्या केबिनमध्ये काम करीत असताना बंदुकीच्या फैरीचा आवाज आला. त्यामुळे तातडीने बाहेर आलो. पाहतो तर उज्ज्वल देशमुख जखमी अवस्थेत होते. त्यांना तातडीने बँकेच्या वाहनात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
- राजेंद्र मोहकरे, उपशाखा अधिकारी स्टेट बँक आॅफ इंडिया मुख्य शाखा श्याम चौक अमरावती
बँकेत इकडून तिकडे गस्त घालत होतो. एका ठिकाणी उभा राहिलो असता, हातातील बंदुकीतून ट्रिगर न दाबताच गोळी चालली. नेमके काय घडले, हे कळलेच नाही.
- शरद महल्ले
सुरक्षा रक्षक