उर्ध्व वर्धात पुरेसा पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 10:01 PM2019-03-17T22:01:25+5:302019-03-17T22:01:54+5:30
सिंचनाकरिता जरी पाणी देणे बंद असले तरी उर्ध्व वर्धा प्रकल्पात अमरावती शहराला वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा अद्यापही शिल्लक आहे. चिंता करण्याचे काहीही कारण नाही. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असल्याचे मत उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सिंचनाकरिता जरी पाणी देणे बंद असले तरी उर्ध्व वर्धा प्रकल्पात अमरावती शहराला वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा अद्यापही शिल्लक आहे. चिंता करण्याचे काहीही कारण नाही. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असल्याचे मत उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी व्यक्त केले.
१६ ते २२ मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह जलसंपदा विभाग व इतर विभागामार्फेत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने धरणातील पाणीसाठ्यात सतत घट होत असून भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे किंवा नाही या अनुषंगाने माहिती घेतली असता, अप्पर वर्धा धरणात २३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये जिवंत पाणीसाठा हा १२० दलघमी असून वर्षभरात फक्त पिण्याकरिता ३६ दलघमी पाणीसाठ्याची मागणी असते. तीन महिन्यांनंतर पाऊस पडणारच आहे. तीन महिने १० दलघमी एवढ्या पाणीसाठ्याची पिण्याकरिता शहरात मागणी आहे. वर्षभरात ४५ ते ५० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होते. सोफीया या वीज निर्मितीच्या उद्योगाकरिता प्रकल्पातून वर्षभरात २० दलघमीची मागणी असते. जुलै महिन्यापर्यंत फक्त ८ दलघमी पाणीसाठ्याची सोफीयाकरिता मागणी असून तो पाणीसाठा आरक्षित ठेवला आहे. प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असली तरी अमरावती शहराला जो पाणीसाठा धरणातून देण्यात येतो त्यासंदर्भाची शहरात टंचाई राहणार नाही. पश्चिम विदर्भातील इतर जिल्ह्यांतील पाणीसाठ्यांची स्थिती चिंताजनक आहे. त्याकारणाने पाणीसाठा जरी असला तरी पाण्याची बचत करणे अनिवार्य असल्याचे मत जलजागृती सप्ताह निमित्त अनेक वरिष्ठ अभियंत्यांनी व्यक्त केले आहे.