पोलिसांच्या मारहाणीमुळे आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: August 19, 2016 11:58 PM2016-08-19T23:58:25+5:302016-08-19T23:58:25+5:30
हप्तेखोर पोलिसांच्या अमानुष मारहाणीनंतर काळीपिवळी चालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
दर्यापूर येथील प्रकार : हप्ता न दिल्याने काळी-पिवळी जप्त केल्याचा तरूणाचा आरोप
अमरावती : हप्तेखोर पोलिसांच्या अमानुष मारहाणीनंतर काळीपिवळी चालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दर्यापूर पोलिसांची ही गुंडगिरी शुक्रवारी उघडकीस आली. संतोष गंगाधर टोळे (२५,रा.दर्यापूर) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या काळी-पिवळी चालकाचे नाव असून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संतोष हा दर्यापूर-अकोट मार्गावर स्वत:च्या मालकीची काळी-पिवळी चालवितो. प्रवासी वाहतुकीचा परवाना असूनदेखील त्याला दर्यापूर पोलिसांकडून हप्ता मागितला जात असल्याचा आरोप संतोषने केला आहे. प्रवासी वाहतुकीकरिता दर्यापूर पोलीस ठाणे व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी संतोषला १ हजार ५०० रूपयांचा हप्ता मागितला. गुरूवारी संतोष हा दर्यापूरहून अकोटला जाण्याकरिता प्रवाशांच्या प्रतीक्षेत होता. त्याच दरम्यान त्याच्याजवळ वाहतूक शाखेचे दोन पोलीस आले आणि त्यांनी हप्त्याची रक्कम मागितली. त्यावेळी पैसे नसल्याने अकोटहून परतल्यानंतर पैसे देतो, असे संतोषने पोलिसांना सांगितले. मात्र, त्याचे काहीही ऐकून न घेता पोलिसांनी संतोषची काळी-पिवळी ताब्यात घेऊन ठाण्यात लावली. शुक्रवारी पैसे देतो, वाहन नेऊ नका, असे आर्जव त्याने पोलिसांना केले.
संतोष मुलीच्या विवंचनेत
अमरावती : परंतु पोलिसांनी कारवाईचा धाक दाखवून संतोषला पट्ट्याने अमानुष मारहाण केली. शुक्रवारी सकाळी पुन्हा संतोष ८०० रुपये घेऊन दर्यापूर ठाण्यात पोहोचला. मात्र, दोन वाहतूक पोलिसांसह तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी पुन्हा बेदम मारहाण केली, असा आरोेप संतोषने केला आहे. पोलीस ऐकत नसल्याचे पाहून संतोष मानसिक तणावात आला आणि त्याने विषारी औषधी प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब तेथील माजी जिल्हा परिषद सदस्य बळवंत वानखडे यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ संतोषला नजीकच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. संतोषच्या दोन वर्षीय मुलीची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे तिच्या उपचारासाठी तो पैशांची जुळवाजुळव करीत होता. उलट त्यालाच पोलिसांनी अमानुष मारहाण केली. संतोष टोळे हा दारू पिऊन वाहन चालविताना आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याचे वाहन ताब्यात घेतले. मात्र, त्यानेच पोलिसांना शिवीगाळ केली. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला मारहाण केली नाही.
- नितीन गवारे,
पोलीस निरीक्षक, दर्यापूर