अमरावती जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत १८० शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 11:33 AM2024-09-26T11:33:44+5:302024-09-26T11:34:18+5:30
वास्तव : आर्थिक अडचणीमुळे नैराश्य
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : सातत्याने दरवर्षी येणारी नैसर्गिक आपत्ती, शेतीतील घटणारे उत्पादन, शेतमालाला मिळणारा कमी दर यामुळे वाढलेली कर्जफेडीची चिंता, अतिवृष्टी, सततचा पाऊस व आर्थिक अडचण जून त्यामुळे आलेले नैराश्य यामुळे जिल्ह्यात ऐन खरीप हंगामाच्या साडेतीन महिन्यांत ५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जूनमध्ये १८, जुलैमध्ये १९, ऑगस्टमध्ये १८ आत्महत्या झाल्या.
२०२४ चा खरीप हंगाम अर्धा संपला आहे. यात मूग, उडीद, सोयाबीन ही पिके पूर्णतः हातून गेली. आता कपाशी व तूर पीक तेवढे बाकी आहे. ही दोन्ही पिके आजच ६० टक्के हातून गेल्यातच जमा आहेत. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. अशातच जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत जिल्ह्यात १८० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे तालुक्याचे धगधगते वास्तव आहे. यात सप्टेंबरमध्ये झालेल्या शेतकरी आत्महत्यांचा समावेश नाही.
जिल्ह्यातील महिनानिहाय आत्महतेची आकडेवारी
जानेवारी - २२
फेब्रुवारी - २६
मार्च - ३५
एप्रिल - २२
मे - २०
जून - १८
जुलै - १९
ऑगस्ट - १८
जिल्ह्यात १८० पैकी फक्त ६५ आत्महत्या मदतीस पात्र
- जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत जिल्ह्यात १८० शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. यापैकी फक्त ६५ आत्महत्या शासनाच्या मदतीस पात्र ठरविण्यात आल्या.
- पात्रपैकी ४९ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देण्यात आली आहे. आत्महत्येची ८२ प्रकरणे प्रलंबित आहेत, तर ३३ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत.